महाराष्ट्रानंतर आता गोव्यात राजकीय ‘भूकंप’ ? संजय राऊतांनी सांगितला ‘प्लॅन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपवर दबाव टाकणाऱ्या आणि भाजपला कोंडीत पकडणाऱ्या संजय राऊत यांनी राज्यात शिवसेनेचे सरकार येताच आता शिवसेनेच्या नेतृत्वाखाली गोव्यात सुद्धा राजकीय भूकंप येणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

गोव्यात लवकरच राजकीय भूकंप होईल, कारण विजय सरदेसाई यांच्यासह चार आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा यावेळी राऊत यांनी केला. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यातच नाही तर देशात भाजप विरोधात मोठी आघाडी येत्या काळात उभी राहणार असल्याचे देखील संजय राऊत यांनी सांगितले. संजय राऊत यांनी भाजप विरोधात अशाच प्रकारच्या पत्रकार परिषद घेऊन दबाव तंत्र वापरले होते.

भाजप आता राऊत यांच्या या भाकिताला कितपत लक्ष देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तत्पूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालेले असून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत काल शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांनी देखील शिवाजी पार्कवर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर झालेल्या कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरेंनी रायगड किल्ल्यासाठी वीस कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसेच त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हे सरकार शेतकऱ्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी आगामी काळात चांगले निर्णय घेईल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Visit : Policenama.com