राज्यातील सत्ता समीकरण न जुळल्यानं राष्ट्रपती राजवट ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. युतीला बहुमत मिळाले असले तरी मुख्यमंत्री पदावरून भाजप-शिवसेनेमध्ये तणाव वाढलेला आहे. त्यामुळे राज्यात सरकार बनण्याबाबतची अनिश्चितता निर्माण झाली आहे. राज्यात सत्तास्थापनेचा तिढा वाढत चालला असून राज्याची पाऊले आता राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने पडत असल्याची अवस्था निर्माण झाली आहे.

युतीतल्या या दोन पक्षांमध्ये तणाव आहेत. त्यामुळे बहुमत असूनही अद्याप युतीची सत्ता स्थापन होऊ शकलेली नाही. मुंबईत आज भाजपकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेची माहिती देणार आहेत. तर शिवसेनेची मातोश्रीवर सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे.

राष्ट्रपती राजवटीची वेळ आली तर तयार राहा –

भाजप आणि शिवसेनेला सरकार स्थापण्याचा जनादेश मिळाला आहे. सरकार स्थापनेची जबाबदारी या दोन्ही पक्षांची आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि विरोधी पक्ष जोरदार विरोधाची भूमिका निभावतील असे विधान काल शरद पवार यांनी केले आहे. दरम्यान रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी ‘शिवसेना सोबत येणार असेल तरच सत्ता स्थापन करा, सत्तेसाठी राष्ट्रवादीचा वा कोणत्याही पक्षातील बंडखोरांचा पाठिंबा मिळवून तडजोड करू नका, राष्ट्रपती राजवटीची वेळ आली तर त्यासाठी तयार राहा’, असे सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडी राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजता सध्याची विधानसभा विजर्सित होईल. त्याअगोदर सत्ता स्थापनेचा दावा करून मंत्रिपदाची शपथ घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आज दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडतात याकडे लक्ष लागले आहे.

Visit : Policenama.com