गळती लागलेल्या काँग्रेसमध्ये आता Incoming ला सुरुवात, धनगर समाजाच्या नेत्यांनी केला पक्षात प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यानंतर गळती लागलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आता इनकमिंगला (incoming-starts-in-congres) सुरुवात झाली आहे. भाजपची सत्ता असताना या दोनही पक्षांना मोठं खिंडार पडले होते. मात्र सत्तेचा सोपान चढताच वारे बदलले आहे. यात राष्ट्रवादीने आघाडी घेतली होती. तर काँग्रेस पक्षात शांतता होती. त्याची चर्चाही सुरू झाली होती. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी समाजातल्या विविध घटकांच्या नेत्यांनी पक्षात प्रवेश करावा यासाठी प्रयत्न केले होते. त्याचाच एक भाग म्हणून धनगर समाजाचे नेते लहू शेवाळे यांना काँग्रेस पक्षाने प्रवेश दिला आहे.

टिळक भवन येथे पार पडलेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सोनल पटेल, डॉ. वामसी रेड्डी, माजी आमदार मोहन जोशी, कल्याण काळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

धनगर समाजाला वळवण्यासाठी राष्ट्रवादी नंतर काँग्रेस पक्षानेही हालचाली सुरू केल्या होत्या. मराठवाड्यात धनगर मतांवर प्रभाव असलेले शेवाळे यांना काँग्रेसने पक्षात घेतले आहे. भाजपाने विधान परिषदेत गोपीचंद पडळकर त्यानंतर राष्ट्रवादीने राज्यपाल नियुक्त विधान परिषदेत मराठवाडा येथील यशपाल भिंगे यांना संधी दिली. आता धनगर मतांकडे लक्ष देत काँग्रेस पक्षानेही धनगर समाजातील नेत्यांना पक्षात संधी दिली आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. धनगर समाजाचे नेते जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहू शेवाळे यांनी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्ष हा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून संविधानात असलेल्या समतेच्या वाटेवरून मार्गक्रमण करणारा पक्ष आहे. शेवाळे यांच्या पक्ष प्रवेशाने काँग्रेस पक्षाला आणखी बळ मिळेल असेही ते म्हणाले. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लहू शेवाळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.