भाजपच्या ताब्यातील मंदिर समिती बरखास्त करून नवीन समिती गठीत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या हालचाली सुरू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भाजपच्या ताब्यात असलेली मंदिर समिती बरखास्त करून नवीन समिती गठीत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात असलेल्या महत्त्वाच्या मंदिर समितींवर अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी राजकीय नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात लॉबिंगही होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीतील मित्रपक्षांत वाटाघाटी झाल्यानंतर पंढरपूरची मंदिर समिती शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे आता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर शिवसेनेचा अध्यक्ष बनणार आहे.

२०१९ मध्ये सत्तापालट झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने अनेक महामंडळे बरखास्त केली. मात्र, देवस्थान समित्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आले नव्हते. पण आता भाजपच्या ताब्यात असलेल्या देवस्थान समित्या काढून, त्यावर नवीन समिती गठीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, या मंदिर समितींवर वर्णी लागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी लॉबिंग सुरू केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पक्षातील मोठ्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्याची माहिती मिळत आहे.

शिर्डीचे संस्थान कोणाकडे ?

शिर्डी संस्थानांवर जुन्या विश्वस्थ मंडळींचा कार्यकाळ समाप्त झाल्यावर नवीन विश्वस्त अथवा अध्यक्षाची नेमणूक करण्यात आली नाही. आता जिल्हा न्यायाधीश प्रभारी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. राज्य सरकारने विधी न्याय खात्याच्या अंतर्गत शिर्डी संस्थान विश्वस्तांची नेमणूक होते. परंतु, महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला शिर्डी संस्थानाचे अध्यक्ष पद मिळणार आणि कोणत्या पक्षाचे किती विश्वस्त असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.