नाव न घेता खडसे-महाजनांची ‘तीरंदाजी’ तीव्र !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या प्रकरणात अनेक बडे नेते अडकल्याचा दावा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. तर दुसऱ्या बाजूला मविप्रतील वादात दाखल गुन्ह्यामागे कोण, हे कथित षडयंत्र सर्वांनाच माहीत आहे. असं गिरीश महाजन म्हणतात. दरम्यान, जिल्ह्यातील हे दोन्ही दिग्गज यासंदर्भात आपापली बाजू मांडत आहेत तेही एकमेकांचे नाव घेत नाहीत. मात्र, प्रसारमाध्यमांच्या धनुष्यातून परस्परांवर तीर सोडण्याचा त्यांचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्टच आहे.

जिल्ह्यात गेल्या एक- दीड महिन्यातच बीएचआर गैरव्यवहार प्रकरणातील कारवाई, त्यापाठोपाठ मविप्र संस्थेतील वादासंबंधी गिरीश महाजनांवर दाखल गुन्हा, प्रफुल्ल लोढांची कथित ‘सीडी’ पत्रपरिषद व लगतच खडसेंना आलेली ‘ईडी’ची नोटीस या घटनाक्रमांवरुन वातावरण ढवळून निघाले. या घटनांचे त्या-त्या ठिकाणी महत्त्व असले आणि या घटनांशी संबंध असलेल्या व्यक्ती, त्यांचे समर्थक त्यांची बाजू नेटाने मांडत असले तरी ही सर्व प्रकरणे व त्यासंबंधी चर्चा माजी मंत्री एकनाथराव खडसे व गिरीश महाजन यांच्याभोवतीच फिरत असल्याचे दिसून येते.

एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषदेत याआधीच दावा केला होतो. अर्थात, त्यांनी यात कुणाचेही नाव घेतले नाही. प्रकरण ताजेच असताना १४ डिसेंबरला मविप्रतील कथित वादासंदर्भात संचालक ॲड. विजय भास्कर पाटलांच्या फिर्यादीवरुन गिरीश महाजनांसह २९ जणांविरोधात निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तो कोथरुड (पुणे) ठाण्याकडे वर्ग झाला. कोथरुड पोलिस ठाण्याने तो ४ तारखेस नोंदवून घेतला. त्यामुळे महाजनांच्या अडचणी अधिकच वाढल्या. अर्थात, हा गुन्हा दाखल होण्यामागे कोण, हे सर्वांनाच माहीत असल्याचा दावा करत महाजनांनीही नाव घेण्याचे टाळत खडसेंकडे इशारा केला आहे. साधारण महिनाभरापूर्वी भाईचंद हिराचंद पतसंस्थेत झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी सुरु केली. चौघांना अटक करत अनेक कागदपत्रेही ताब्यात घेतली. संस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे व मालमत्तांची कवडीमोल भावात खरेदी केल्याचा आरोप असलेला व्यावसायिक सुनील झंवर फरारी असले तरी यामागे काही बडे नेतेही आहेत.

दरम्यान, ही प्रकरणे घडत असताना खडसेंच्या दारी ‘ईडी’ची नोटीस येऊन धडकली. राष्ट्रवादीत प्रवेश करताना त्यांनी स्वत:च ‘ईडी’चा उल्लेख करताना ‘सीडी’ काढू, असा इशारा दिला होता. त्यामुळे ‘सीडी’ प्रकरणही चांगलेच चर्चेत आले. या प्रकरणांची चर्चा होत असताना त्यात या क्षणापर्यंत तरी कोणत्याही नेत्यापर्यंत कारवाईचा हात पोचलेला नाही, हे स्पष्टच आहे. तर पहूरमधील (ता. जामनेर) प्रफुल्ल लोढांकडील कथित ‘सीडी’ प्रकरणाने यात नव्याने भर पडली आहे. परंतु, खडसे अथवा लोढा किंवा अगदी मविप्र प्रकरणी फिर्याद देणारे ॲड. विजय पाटील सांगतात त्या कथित ‘सीडी’मधील तथ्य अद्यापही बाहेर येऊ शकलेले नाही.. त्यामुळे ‘सीडी’बाबत सर्वच अनभिज्ञ आहे. या सर्व घटनाक्रमात बीएचआरमधील कथित गैरव्यवहार, मविप्रतील वाद, खडसेंची भोसरी जमीन खरेदी प्रकरणी याआधीही झालेली चौकशी या सर्व बाबी उघड आहेत.

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून अस्वस्थ असलेले खडसे शांत बसणार नाही, असे बोलले जाते.. आणि पक्षाचे संकटमोचक म्हणून लौकिक मिळविलेले महाजन स्वत:वरील कथित ‘संकटा’चेही मोचन करतील, असाही दावा केला जातोय.. त्यामुळे नव्यानेच सुरु झालेल्या या वर्षातही खडसे- महाजनांमधील शीतयुद्ध व त्यातून मिळणारी नवनवीन प्रकरणे.. बातम्यांची मालिका अशीच सुरु राहील, असे चित्र पाहायला मिळेल. बीएचआर गैरव्यवहार प्रकरण वगळता ही प्रकरणे खरेतर परस्पर वादाचीच आहेत. त्यात कुठेही व्यापक जनहिताशी संबंधित अथवा नागरी विकासाचा विषय नाही. तरीही, या प्रकरणांचीच चर्चा होतेय. यानिमित्ताने एका पक्षात असताना खडसे- महाजनांमध्ये सुरु असलेला वाद आता खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतरही कायम आहे व केवळ वादच नव्हे तर अशा प्रकरणांमधून दोन्ही नेते परस्परांवर ‘तीरंदाजी’ही करीत आहेत.