..म्हणून राजकीय पक्षांचे कार्यकर्तेच वाटत आहेत मतदान ओळखपत्र

रामटेक : पोलीसनामा ऑनलाईन – मतदानासाठी नवीन मतदारांना ओळखपत्र देण्याचे काम प्रत्येक निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाकडून करण्यात येते. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदारांना त्यांचे मतदार ओळखपत्र घरोघर नेवून देत असल्याचे चित्र रामटेकमध्ये पाहण्यास मिळाले आहे. जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून राजीखुशी हा प्रताप घडवण्यात आल्याची धक्कादायक घटना या मतदान ओळखपत्र वाटपातून उघड झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाचा भाग म्हणून नवीन मतदारांना ओळखपत्र वाटण्याचे काम सध्या केले जाते आहे. रामटेक मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या वाड्या वस्तांवर सध्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मतदार ओळखपत्र वाटण्याचे काम केले जाते आहे. या मतदारांपैकी काही मतदारांनी या कृतीवर आक्षेप घेतल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला आहे. कायदेशीर दृष्ट्या बीएलओ यांनी मतदारांना मतदार ओळखपत्र वाटण्याचे काम करायचे असते. मात्र शिवसेनेचे कार्यकर्त्येच हे काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार रामटेकमध्ये घडला आहे.

जिल्हा प्रशासनाकडे या बाबत विचारणा केली असता त्यांनी हा सर्व प्रकार गंभीर आणि धक्कादायक असल्याचे म्हंटले आहे. त्याच प्रमाणे या सर्व प्रकारची दखल घेऊन दोषींवर कार्यवाही करण्याचे आश्वासन देखील जिल्हा प्रशासनाने दिले आहे.