यंदाच्या विधानसभेत नात्यागोत्यांचा मेळावा, घराणेशाहीचा ‘दबदबा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्र विधानसभेचे निकाल जाहीर झाले आहेत. राजकारणात घराणेशाहीवर नेहमी बोलले जाते आणि टीका देखील केली जाते. मात्र, यंदाच्या विधानसभेत नातलगांचा मेळा असून घराणेशाहीचा दबदबा कायम आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणाच्या प्रवाहात कधी संधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काही परिवारांचे वर्चस्व असून त्यांच्याच परिवारातील नातेवाईकांना प्रमुख पदं उपभोगायला मिळत असल्याचे पहायला मिळत आहेत. विधानसभेच्या निकालानंतर अनेक बडे नेते आणि त्यांचे नातलग विधानसभेत पहायला मिळणार आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेला घराणेशाहीचा आणि नात्यागोत्यांचा पॅटर्न आज पवार, देशमुख, मुंडे, चव्हाण, विखे-पाटील आणि ठाकरे परिवारापर्यंत पोहचला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पहिले व्यक्ती आहेत.

राज्याच्या राजकारणात पवार घाराण्याची पॉवर खूप मोठी आहे. त्याचा प्रत्यय या निवडणूकीत दिसून आला. काका अजित पवार यांच्यासोबत आता पुतणे रोहित पवार देखील विधानसभेत दिसणार आहेत. रोहित पवार यांनी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करत विधानसभा गाठली आहे. तर अजित पवार यांनी आपला पारंपारिक बारामती विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला. पवार घराण्यातील सुप्रीया सुळे या देखील याच मतदारसंघातून खासदार आहेत. तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांचे भाचे राणा जगजितसिंह पाटील हे देखील तुळजापूरमधून विजयी झाले आहेत.

मराठवाड्याती बीडच्या परळीत भावा-बहिणीमध्ये झालेल्या वादामुळे ही निवडणूक राज्यात प्रचंड गाजली होती. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले होते. यामध्ये भाऊ धनंजय मुंडे यांनी बाजी मारत भाजपच्या उमेदवार आणि बहिण पंकजा मुंडे यांचा परभाव केला. पंकजा मुंडे यांच्या लहान बहिण डॉ. प्रितम मुंडे यांनी पंकजा यांना विजयी करण्यासाठी जंगजंग पछाडले मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. तर दुसरीकडे बीडमध्ये काका-पुतण्याच्या लढाईत पुतण्याने बाजी मारली. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना कडवे आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीने त्यांचेच पुतणे संदीप क्षीरसागर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. यामध्ये संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला.

लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या दोन्ही मुलांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला. त्यामुळे देशमुख कुटुंबातील दोन्ही सुपुत्र आता विधानसभेत दिसणार आहेत. तर निलंग्यातील माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलेंगकर यांचे पुत्र अशोक पाटील यांना पुतणे कॅबिनेट मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पराभूत केले.

सोलापूरमध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे याच्या कन्या प्रणिती शिंदे विजयी झाल्या आहेत. नाशिकमधून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ येवल्यातून विजयी झाले आहेत. तर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या श्रीवर्धनमधून पहिल्यांदाच आमदार झाल्या आहेत. तसेच माढ्यातून शिंदे बंधू विधानसभेत एकत्र दिसणार आहेत. कणकवलीतून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे विजयी झाले आहेत. जालन्यातून रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे पुन्हा विधानसभेत पोहोचले आहेत. तर शिर्डीतून राधाकृष्ण विखे-पाटील विजयी झाले आहेत. तर त्यांचे चिरंजीव सुजय विखे खासदार आहेत.

Visit : Policenama.com