‘मुलायम सिंहांनी शुभेच्छा दिलेले नेते पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोळाव्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच काल (दि.13) समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांनी काल मोदींना शुभेच्छा देत मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. आगामी निवडणुकीतही भाजपचाच विजय होऊ दे आणि नरेंद्र मोदीच पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान बनावेत अशा शुभेच्छा मुलायम सिंह यादव यांनी दिल्या. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या शिवाय त्यांच्या या विधानावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येताना दिसून आल्या. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मुलायम सिंग यांनी आतापर्यंत ज्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या, ते नेते पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत”. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी हे विधान केले.

वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाला मदत लागली तर ती आम्ही करु, परंतु त्यांना गरज लागणार आहे का? कारण त्यांना आता मुलायम सिंह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुलायम सिंगांनी शुभेच्छा दिलेले नेते पुन्हा पंतप्रधान झालेले नाहीत, त्यामुळे आता भाजपला एनडीए मजबूत करावी लागणार आहे”.

बुधवारी (दि- 13) 16 व्या लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी अखेरचे भाषण केले. या भाषणानंतर समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या. मुलायम सिंह म्हणाले की, “मी पंतप्रधानांना शुभेच्छा देऊ इच्छितो. ते पुन्हा पंतप्रधान व्हावेत, असं मला वाटतं. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्व सदस्य निवडून यावेत आणि तुम्ही पुन्हा पंतप्रधान व्हावं”.
वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांना, भाजपकडून आज व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा आल्या का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “आम्ही संक्रांत साजरी करतो, त्यामुळे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आम्ही डे पाळत नाही, डे साजरे करून प्रेम करता येत नाही. प्रेमात भावना असते. आदर असेल तर प्रेमही होतं, त्यानंतर लग्न होतं, संसार होतो, परंतु जुळलं नाही, तर काडीमोड होतो”.