लोकशाहिरांच्या अनुयायांचा राजकारण्यांना विसर : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – अनेक प्रतिभासंपन्न लेखक-कलावंत मातंग समाजातसुद्धा आहेत. समाजकार्यासह सहकार विश्वातही कर्तृत्व सिद्ध करणारे शेकडो निष्ठावंत मराठी जन प्रत्येक काळात होते, आहेत. तरीही राजकीय संस्कृतीला अण्णाभाऊ साठे यांच्या अस्सल महाराष्ट्रप्रेमी अनुयायांचा विसर का पडावा ?, असा सवाल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी उपस्थित केला आहे.

मातंग समाजाला मागिल 60 वर्षांत एकदाही विधान परिषदेवर प्रतिनिधित्व मिळालेले नाही. राज्यपालांद्वारे नामनिर्देशित होणाऱ्या 12 प्रतिनिधींच्या जागा नुकत्याच (15 जून) रिक्त झाल्या आहेत. या जागांवर साहित्य, कला, क्रीडा, संगीत, शिक्षण, समाजकार्य आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मातंग समाजातील व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी मातंग समाजाने राज्यभरात सोशल मीडियाद्वारे मोठी मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेला डॉ. सबनीस यांनी पत्र आणि फेसबुक लाईव्ह व्हिडिओ संदेशाद्वारे पाठिंबा दिला आहे.

बहुसांस्कृतिक महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर आजवर मातंग समाजाचा एकही प्रतिनिधी नसावा ? शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षात तरी नियम व निकषांच्या आधीन राहून योग्य कर्तृत्वाला संधी मिळावी, असे आवाहन डॉ. सबनीस यांनी या संदेशाद्वारे केले आहे. शाहीर अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात संयुक्त महाराष्ट्र निष्ठेशी इमान राखत नवा इतिहास घडावा, अशी अपेक्षाही डॉ. सबनीस यांनी व्यक्त केली आहे.