नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटलांचे नाव देण्यासाठी मुख्यमंत्र्याशी चर्चा करेन – नाना पटोले

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन – लोकनेते दि. बा. पाटील यांनी ओबीसी समाजासाठी केलेले काम अतुलनीय आहे. त्यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन असे आश्वासन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. तसेच सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्र्याशी भेट घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करेन असेही पटोले यांनी म्हटले आहे.

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि. 26) कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भातील निवेदन दिले. त्यावेळी पटोले यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे. कृती समितीचे अध्यक्ष, दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळात कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कार्यकारिणी सदस्य जे. एम. म्हात्रे, ओबीसी नेते जे. डी. तांडेल, दीपक म्हात्रे, संतोष केणे, मेघनाथ म्हात्रे आणि जासई ग्रामस्थांचे इतर प्रतिनिधी आदींचा समावेश होता.

मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी करत आहेत. याबाबतचा पत्रव्यवहार राज्य व केंद्र सरकारकडे करण्यात आला आहे. यासाठी रायगड, नवी मुंबई, ठाणे, पालघर यांसह अनेक जिल्ह्यांत मोठी चळवळ उभी राहात आहे. त्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना केली आहे.