जामीन मिळाल्यानंतर फडणवीस म्हणाले, यामागे कोण आहे माहित आहे !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना नागपूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी हजर झाले होते. 2014 मधील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. 30 मार्च रोजी पुढच्या सुनावणीसाठी हजर रहावे लागणार आहे.

फडणवीस यांनी 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात 1993 ते 1998 दरम्यानच्या दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आज नागपूर न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीसाठी हजर राहण्याचे समन्स त्यांना बजावण्यात आले होते. फडणवीस यांच्या वतीने अॅड. सुनील मनोहर यांनी बाजू मांडली. तर सतीश उके यांनी विरोधात युक्तिवाद केला. सुनावणीअंती न्यायालयाने फडणवीस यांना जामीन मंजूर केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्यावरील सर्व गुन्हे हे जनतेसाठी केलेल्या आंदोलनांचे गुन्हे आहेत. वैयक्तिक कारणातून एकही गुन्हा आजवर माझ्यावर दाखल झालेला नाही. त्यामुळे कोणतेही गुन्हे लपवण्याचा प्रश्न येत नाही. ज्या दोन गुन्ह्यांबद्दल माझ्या विरोधात आरोप केले जात आहेत, ते निवडणुकीवर परिणाम करणारे गुन्हे नव्हते. न्यायालयासमोर मी माझं म्हणणं मांडेन. न्यायालयाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच या सगळ्यामागे कोण आहे हेही मला चांगलं माहित आहे. योग्य वेळी सांगेन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.