जबरदस्तीने दुसऱ्याचे मतदान करणाऱ्या ‘त्या’ पोलिंग एजंटला अटक

फरीदाबाद : वृत्तसंस्था – मतदान केंद्रात महिला मत देत असताना तेथे जाऊन पोलीस एजंट जबरदस्तीने स्वत: बटण दाबत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी हरियाणातील फरिदाबाद येथून एकाला अटक केली आहे.
फरिदाबाद च्या पृथला येथील आसावतीच्या एका मतदान केंद्रावर हा प्रकार रविवारी घडला होता.

मतदान केंद्रातील पोलिंग एजंटच्या जागेवर एक जण बसला होता. मतदान करायच्या कक्षात एक महिला जेव्हा मत देण्यासाठी जाते. तेव्हा हा पोलिंग एजंट अचानक उठतो व मतदान कक्षात जाऊन त्या महिलेच्या अगोदर बटण दाबतो व पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसतो. या व्हिडिओत मतदान केंद्रात कोणीही अधिकारी त्याला अडविताना दिसत नाही. हा व्हिडिओ तेथेच त्याच्या शेजारी बसलेल्या दुसऱ्या पोलिंग एजंटने काढलेला दिसत आहे.

हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी तो निवडणुक आयोगाला टँग करुन यावर कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत निवडणुक आयुक्त अशोक लवासा यांनी सांगितले की, या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.