श्रीगोंदा नगरपालिकेसाठी शांततेत मतदान सुरू

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – श्रीगोंदा नगरपालिकेसाठी आज सकाळी आठ वाजता  मतदानास प्रारंभ झाला आहे. राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या या निवडणुकीवर नगर जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले आहे. उद्या सकाळी मतमोजणी होणार आहे. आतापर्यंत कोणताही अनुचित प्रकार झालेला नव्हता.

प्रभाग क्रमांक एक व सहा हे संवेदनशील मानले जातात. त्यामुळे या प्रभागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निर्भय वातावरणात मतदान व्हावे, यासाठी पोलीस विभागाने मोठी तयारी केली आहे. ९ प्रभागात ३२ बूथ असून प्रत्येक बूथवर एक अधिकारी आणि ५ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मोबाईल व्हॅनद्वारे पोलिसांचे घडामोडींवर लक्ष आहे. निवडणूक प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येणार आहे.

५६ जण तडीपार

 पक्षांतर आणि तडीपारीची कारवाई असलेल्या उमेदवारांमुळे काही प्रभागात मोठी चुरस आहे. पोलिसांनी सीआरपीएस १४४ नुसार ५६ जणांना तडीपारीची प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे. त्यातील ३ जणांना हमीपत्र घेऊन शहरात रहाण्याची सूट देण्यात आली आहे. आज मतदान असून सोमवारी पंतनगर हॉल येथे मतमोजणी होणार आहे. त्यादृष्टीने निवडणूक प्रशासनाने तयारी केली आहे.

आघाडी व भाजपाची प्रतिष्ठापणाला

निवडणूक श्रीगोंदा नगरपालिकेची असली, तरी या निवडणूक  निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजपात गेलेले माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा २०१४ ला विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल जगताप यांनी पराभव केला होता. त्यामुळे पाचपुते यांच्यासाठी २०१९ च्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. त्यांच्या विरोधात आमदार राहुल जगताप आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व राजकीय ताकद पणाला लावली आहे. त्यामुळेच दोन्ही बाजूने प्रचारात राज्यस्तरीय नेते उतरवले गेले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे आदी अनेक नेत्यांनी श्रीगोंद्यात प्रचारसभा घेतल्या होत्या.