राजस्थान, तेलंगणामध्ये मतदानाला सुरूवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा शेवटचा टप्पा आज, शुक्रवारी पार पडणार आहे. राजस्थान आणि तेलंगण या दोन राज्यांमध्ये आज कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले आहे. राजस्थानात २०० जागांसाठी मतदान होत असून, तेलंगणमध्ये ११९ जागांसाठी मतदान होत आहे. तेलंगणामध्ये ३२ हजार ८१५ केंद्रांवर मतदान होत असून, अंदाजे तीन कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावतील.
निवडणूक आयोगाचे दीड लाख अधिकारी आणि कर्मचारी तेलंगणामध्ये सक्रिय आहेत. राजस्थानमध्ये ५१,६८७ मतदान केंद्रांवर निवडणूक होणार असून, १३० जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत रंगणार आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीत पणाला लागले असून, भाजप राजस्थानात कशी कामगिरी करतो हे पाहणे ‌उत्सुकतेचे असेल. पाचही राज्यांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या मंगळवारी (११ डिसेंबर) जाहीर होणार आहेत.
जनमत चाचणीनुसार प्रथमदर्शनी सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजीमुळे काँग्रेस जिंकण्याचे चित्र आहे. मात्र, भाजपप्रमाणे काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा चेहर समोर न केल्याने याचा तोटा त्यांना सहन करावा लागू शकतो. वसुंधराराजेंच्या तोडीचे नेतृत्व काँग्रेसकडे आहे का, याबाबत लोक साशंक आहेत. काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी राज्याचे प्रमुख सचिन पायलट आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याच रस्सीखेच आहे. २०० सदस्यसंख्या असलेल्या राजस्थान विधानसभेत बहुमतासाठी १०१ जागांची आवश्यकता आहे. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २०० पैकी तब्बल १६३ जागांवर विजय मिळवत काँग्रेसचा एकतर्फी पराभव केला होता. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसला मोजून २१ जागा जिंकता आल्या होत्या. यावेळेस राजस्थानमधील जनता पुन्हा एकदा वसुंधरा यांना राजमान्यता देते की भाजपनंतर काँग्रेस हा पॅटर्न कायम ठेवत काँग्रेसला संधी देते, हे निकालातूनच स्पष्ट होईल.