पूजाची आई मंदोधरी आणि वडिल लहू चव्हाण यांच्यावर आजी शांता राठोड यांचा गंभीर आरोप, केला ‘हा’ मोठा गोप्यस्फोट (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सोशल मीडियात व्हायरल झालेल्या कथित १२ व्हिडीओ क्लिप तसेच काही महत्त्वाच्या घडामोडींमुळे शिवसेना नेते संजय राठोड यांनी वनमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यातच रोज नवनवीन माहिती समोर येत असून संजय राऊत यांच्यावर आरोप होऊनही त्यांनी तब्ब्ल दोन आठवडे यावर काही भाष्य केल नाही. त्यानंतर पोहरादेवीतलं शक्तिप्रदर्शन राठोड यांना महागात पडलं. दरम्यान, संजय राठोड यांनी पूजा चव्हाणच्या आई वडिलांना ५ कोटी रुपये दिले. त्यामुळेच ते गप्प आहेत, असा गंभीर आरोप पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांता राठोड यांनी केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

शांता राठोड म्हणाल्या, मी पहिल्या दिवसापासूनच पूजाला न्याय मिळावा यासाठी आवाज उठवलेला आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांना पूजाचे आई वडिल भेटायला गेले. आई वडिलांकडूनच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पैशापोटी पूजाच्या आई वडिलांना स्वत:च्या लेकराची किंमत केली नाही. त्यांना चुलत आजीबद्दल काय वाटणार? समाजाची दिशाभूल झालेलीच आहे. आता पूजाचे आई-वडील मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत.

पूजाच्या आई वडिलांना संजय राठोड यांनी ५ कोटी देऊन त्यांचं तोंड बंद केलं आहे. त्यामुळेच स्वत:च्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी ते पुढे येत नाहीत. आणि आता ते आमची मुलगी तणावात होती असेच आयुष्यभर सांगणार. द्बकाच्च आवाज कायम राहणार कारण पैसा मिळाला आहे आणि तोच पैसा आता बोलत आहे. पूजाचा घात झाला आणि तोच दडपण्याचा प्रयत्न पैशापोटी सुरू आहे,’ असा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पूजाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंतीदेखील शांता राठोड यांनी केली.

पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आईवडील, बहिण उपस्थित होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्याना एक पत्रही दिले. त्यामध्ये त्यांनी आमचा कोणावरही आरोप नाही, संजय राठोड यांचा बळी देऊ नका अशी विनंती केली आहे.

पूजाच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र जशास तस …
माननीय मुख्यमंत्री महोदय
महाराष्ट्र राज्य

विषय : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी होणारी आमची व आमच्या समाजाची बदनामी थांबवणेबाबत

महोदय,

आमची मुलगी पूजा चव्हाण हिचा दिनांक सात फेब्रुवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाला कुठल्याही माता-पितासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो आमची ही वेदना आता कधीही भरून येणार नाही. मुलीच्या अकाली मृत्यूच्या दुःखापेक्षा अधिक त्रासदायक व आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीच्या मृत्यू संदर्भात जी चर्चा होत आहे तिच्यावर खूप गलिच्छ आरोप लावून श्री संजय राठोड राज्य मंत्री यांचे नाव घेऊन उलटसुलट बातम्या येत आहेत जे निराधार आहेत.

आपण या संदर्भात पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या घटनेचा तपास वेगाने व्हावा जे दोषी असतील त्यांच्यावर आपण निश्चितच कारवाई कराल याची खात्री आहे. आमच्या मुलीचा बळी गेला पण फक्त संशयावरून कोणाचाही बळी जाऊ नये. श्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केली नाही. आमची मुलगी गमावली परंतु या आड राजकारण करून दररोज होणाऱ्या आरोपाने तिचा रोज बळी जातोय. याचं राजकारण करून श्री संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीव राजीनामा घेऊ नका. तपासामध्ये श्री राठोड किंवा अन्य कोणीही दोषी आढळल्यास कठोर कारवाई करून न्याय द्यावा. परंतु संशयावरून मुलीवर किंवा कोणावरही आरोप करू नयेत. श्री संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत ते खूप कष्ट करून इथपर्यंत पोहोचले आहे फक्त संशयावरून त्यांचा बळी घेऊ नये. तपास पूर्ण झाल्यावर दोषीवर कारवाई करावी राजकारणामुळे व दबावामुळे घाईत निर्णय घेऊ नये आमच्या आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आपण आम्हाला न्याय द्या

आपले नम्र
लहू चंदू चव्हाण (वडील)
मंदोधरी लहू चव्हाण (आई)
दिव्यानी लहू चव्हाण (बहीण)