चित्रा वाघ यांनी आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पूजाच्या वडिलांना केलं आवाहन, म्हणाल्या – ‘मलाही लेकीबाळी आहेत’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांचे नाव चर्चेत आले. आणि सर्वत्र खळबळ उडाली. सध्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात केलेल्या आत्महत्येला राजकीय वळण लागले आहे. दरम्यान, विरोधी पक्ष असलेला भाजपा आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) ह्या राठोड यांच्याविरोधात कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. राठोड यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, प्रसारमाध्यमांमध्ये होत असलेली चर्चा आणि भाजपाकडून(BJP) या प्रकरणात संजय राठोड यांच्याविरोधात उठवण्यात येत असलेल्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर काल पूजा चव्हाणच्या (Pooja Chavan) वडिलांनी आपल्या मुलीची बदनामी थांबवा, अन्यथा आम्ही आत्महत्या करू असा इशारा दिला होता. आता आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पूजा चव्हाणच्या वडिलांना चित्रा वाघ यांनी आवाहन केले आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, की या प्रकरणात आम्हाला राजकारण करायचं नाही. कुठलीही मुलगी, महिलेवरून राजकारण करावं लागलं तर मी राजकारण सोडून देईन. मात्र या प्रकरणात संशयाची सुई असलेल्या संजय राठोड यांच्यावर कारवाई व्हावी, असे पूजाच्या वडलांना वाटत नाही का. तसेच याबाबत त्यांची काही तक्रार नसली. पोलीस या प्रकरणात स्युमोटो दाखल करू शकतात. पूजा ही आता केवळ तिच्या आई-वडिलांची नव्हे तर महाराष्ट्राची मुलगी झाली आहे. तिला न्याय मिळाला पाहिजे. तिचे आईवडील दबावात आहेत. एवढ्या मोठ्या माणसाला आव्हान देणं कठीण आहे. मी विरोधात बोलले तर काय झालं हे तुम्ही पाहतच आहात. तसेच मी संजय राठोड याला बंजारा समाजाचा मानत नाही. बंजारा समाजाने वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक अशी रत्ने दिली. संजय राठोडसारखा नराधम बंजारा समाजाचा असूच शकत नाही, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला.

माझ्या नवऱ्याला गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रास दिला जातो. मलाही काही प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. आता नवी माणसं उभी करून माझ्यावरही काही गुन्हे दाखल होतील. मात्र मी याला घाबरत नाही. आता मीच तुम्हाला पुरून उरणार. पूजा चव्हाण प्रकरणावर बोलणार, रोज बोलणार आणि न्याय मिळेपर्यंत बोलत राहणार, असे प्रतिआव्हानच चित्रा वाघ यांनी दिले. यावेळी चित्रा वाघ यांनी लाचलुचपत प्रकरणात पतीवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे.