Pooja Chavan Death Case : … तर भाजपचे सगळे आमदार राजीनामा देणार, फडणवीसांचा सरकारला इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवार पासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्री संजय राठोड यांच्यावर नाराज असल्याचे मागिल काही दिवसांपासून ऐकत आहोत. मग गेल्या 18 दिवसांमध्ये तमाशा कशासाठी सुरु आहे, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील मंत्री, सत्ताधारी आणि सामान्यांसाठी वेगवेगळे नियम आहेत का, असा प्रश्न विचारला आहे. तसेच महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकारने शक्ती कायदा आणण्याची तयारी सुरु केली आहे. शक्ती कायद्यासाठी सरकारनं समिती स्थापन केली आहे. मात्र, एका मंत्र्यावर एवढे गंभीर आरोप होत असताना मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेत नाही. राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, तर आम्ही शक्ती कायद्यासाठी गठित समितीतून राजीनामे देऊ, असा इशारा फडणवीस यांनी सरकारला दिला आहे.

भक्कम पुरावे असताना कारवाई का नाही ?

नव्या कायद्यांमुळे मंत्र्यांना, सत्ताधाऱ्यांना लैंगिक स्वैराचार करण्याचा अधिकार मिळतो का, राठोड यांच्या विरोधात एवढे भक्कम पुरावे असताना त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही. ऑडिओ क्लिप, पूजा चव्हाण यांच्या मोबाइलवर आलेले राठोड यांचे 45 मिस्ड कॉल, 100 नंबर आलेला कॉल एवढे पुरावे असतानाही राठोड यांना पाठीशी का घातले जात आहे, अशी प्रश्नांची सरबत्ती फडणवीस यांनी केली. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचा दोष नाही, त्यांना वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याचे म्हणत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं.

सत्तेसाठी लाचारी पत्करु नका

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीवरुन फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीला मुख्यमंत्री अभिवादन करत नाहीत. त्यांच्याकडून साधं एक ट्विट केलं जात नाही. ही किती मोठी लाचारी आहे. काँग्रेसने कायम सावरकरांवर अन्याय केला आहे. मात्र, शिवसेनेनं सत्तेसाठी सावरकरांवर जो अन्याय केला, त्याचं माला जास्त आश्चर्य वाटतं. माझा शिवसेनेला फुकटचा सल्ला आहे. सरकार येतं जातं, पण सत्तेसाठी कोण किती लाचारी पत्कारली, याची नोंद इतिहास ठेवत असतो. काँग्रेससोबत राहून शिवसेनेनं सत्तेसाठी लाचारी पत्करु नये, असा टोला त्यांनी लगावला.