Pooja Chavan Suicide Case : भाजपकडून द्रुतगती महामार्ग रोखण्याचा प्रयत्न, 35 आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर ठाकरे सरकारने अद्यापही कारवाई केली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या भाजपाच्या वतीने राठोड यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी (दि. 27) पनवेलमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी शरद पवार जागे व्हा अशा घोषणा देत कळंबोली येथे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत 35 आंदोलकांना ताब्यात घेतले.

महापौर कविता चौतमोल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सभापती मोनिका महानवर आणि इतर नगरसेविकासह भाजपच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलकांनी कळंबोलीतील द्रुतगती महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत महापौरासह महिला व पुरुष अशा 35 आंदोलकांना ताब्यात घेतले. मार खावा लागला तरी आम्ही हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.

दरम्यान सोमवारपासून सुरु होणा-या अधिवेशनात पुजा चव्हाण प्रकरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची भाजपची रणनीती आहे. सत्ताधारी शिवसेना राठोडांना पाठीशी घालत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. राठोड हे अधिवेशनात मंत्रिपदी कायम राहिल्यास विरोधकांना सरकारची कोंडी करण्याची संधी आयतीच मिळणार आहे. दरम्यान हे प्रकरण अधिवेशनात सरकारसाठी त्रासदायक ठरू शकते, हे लक्षात घेऊनच वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असा सूर सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही तसेच मत व्यक्त केले आहे.