संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता विरोधकांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घ्यावा, अशी मागणी लावून धरली आहे. राठोड प्रकरणात नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा घेतला, त्याच प्रकारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. परंतु संबंधित महिलेने तक्रार मागे घेतल्याने हे प्रकरण शांत झाले. परंतु आता मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. महिलेसोबत परस्पर संबंध ठेवणे आणि तिला दोन मुल असणे हे संपूर्ण प्रकरण मुंडे प्रकरणात समोर आले होते. लग्न झालेल असतानाही दुसऱ्या महिलेसोबत संबध ठेवणे यावरूनही विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. इतकेच नाही तर धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करूणा धनंजय मुंडे यांनीही संजय राठोड प्रकरणानंतर आम्ही न्याय मागतो, भीक नाही म्हणत या प्रकरणावर भाष्य केले आहे. तसेच करूणा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात विधान केले आहे, आणखी किती पूजाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे? असा सवाल करूणा यांनी विचारला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उशिरा का होईना, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला त्याचे आम्ही स्वागत करतो. शरद पवार यांनीही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या प्रकरणात सावध भूमिका घेतलेल्या पंकजा मुंडे यांनीही धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असे म्हटले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना एक प्रश्न विचारला होता, राठोड यांचा राजीनामा घेतला तसा मुंडे यांचा राजीनामा घेणार का? त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते की, त्यांच्या प्रकरणात महिलेने तक्रार मागे घेतली, मग प्रतिप्रश्न केला की राठोड यांच्याप्रकरणात तक्रार नाही तरीही राजीनामा घेतला त्यावर सीएम बोलले की नैतिकदृष्ट्या त्यांनी हा राजीनामा दिला आहे.