भाजप नेत्याचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘वाघ आहोत अशा डरकाळ्या फोडण्यापेक्षा वाघाला साजेशी भूमिका घ्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. मात्र घटना घडून 17 दिवस झाल्यानंतरही या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही. यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आम्ही वाघ आहोत अशा डरकाळ्या फोडण्यापेक्षा चित्राताई वाघ यांच्यासारखी वाघाला साजेशी भूमिका घ्या. मुख्यमंत्री महोदय आमच्यासाठी नको पण, तमाम महाराष्ट्रातील माता-भगिनींसाठी तुमचे मौन सोडा. वनमंत्र्याच्या प्रकरणी तुमच्या प्रतिमेला साजेशी वाघासारखी भूमिका घ्या असे ट्विट करत शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान भाजपाच्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना थेट हत्यारा संबोधत या प्रकरणी राठोड यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी (दि. 25) पुण्यात पूजा चव्हाण आत्महत्या केलेल्या घटनस्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांना पूजा चव्हाण राहत असलेली खोली सील केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वाघ यांनी वानवडी पोलिसांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर व संजय राठोडवर आणि पुणे पोलिसांवर जोरदार हल्लाबोल केला. वाघ म्हणाल्या की, वानवडी पोलीस निरीक्षक रगेल, मग्रूर आहेत. ते ज्या भाषेत बोलले त्या भाषेत पोलीस महासंचालक देखील बोलले नाहीत. 17 दिवस उलटूनही गुन्हा दाखल का केला नाही, पोलिस म्हणात की लेखी आदेश नाहीत. पोलीस लेखी आदेशाची वाट बघत आहेत. तसेच पोलिसांचा कुणीतरी मोठा बाप आहे तिथे तो त्यांना सांगत असावा तू घाबरु नको. तसेच हत्यारा संजय राठोडला वाचवण्यासाठी तुम्ही सगळं पणाला लावणार का असा सवाल देखील वाघ यांनी उपस्थित केला आहे.