Pooja Chavan Suicide Case : भाजपच्या नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले – ‘पोलिसांचा मला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   परळी येथील तरुणी पूजा चव्हाण हिने पुण्यात आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर तिचा लॅपटॉप भाजपचे स्थानिक नगरसेवक धनराज घोगरे यांनी घेतला असल्याचा दावा पोलिसांनी केला. त्यासाठी नगरसेवक धनराज घोगरे यांना नोटीस बजावून लॅपटॉप जमा करण्यास सांगितले होते. मात्र, या प्रकरणात मी माणुसकीच्या दृष्टीने घटनेच्या दिवशी मदत केली. त्याच दिवशी घटनास्थळी असलेला मोबाईल पोलिसांकडे दिला आहे. मात्र पोलिसांकडून नोटीस पाठवून मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा धक्कादायक खुलासा नगरसेवक धनराज घोगरे यांनी आज केला. नगरसेवक धनराज घोगरे यांनी आज वानवडी पोलिसांची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते.

पुण्यात वानवडी भागात पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हे प्रकरण घडून 25 दिवस उलटून गेल्यानंतरही या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणाचे मोठं राजकारण झाले असून या प्रकरणात संजय राठोड यांना आपले मंत्रिपद गमवावे लागले आहे. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येला संजय राठोड हे जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्येनंतर वानवडी परिसरातील स्थानिक भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांच्याकडे पूजाचा लॅपटॉप असल्याचा संशय वानवडी पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या संदर्भात घोगरे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मात्र धनराज घोगरे यांच्याकडे लॅपटॉप नसून त्यांना विनाकारण त्रास देऊ नये, असे भाजपचं म्हणण आहे. त्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सुनील कांबळे, स्थानिक नगरसेवक धनंजय घोगरे यांनी आज वानवडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपक लगड यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणाचा योग्य तपास करावा. ज्या धनराज घोगरे यांनी मदत केली. त्या व्यक्तीला नोटीस पाठवली. ती बाब चुकीची असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मदत करणाऱ्याला पोलिसांची नोटीस : जगदीश मुळीक

पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्यानंतर भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी मदत केली. मात्र, त्यानंतर त्यांनाच नोटीस बजावण्यात आली असून ही बाब निषेधार्थ आहे. यातून एकच स्पष्ट होते की, आरोपी मोकाट फिरत आहेत आणि मदत करणाऱ्यांना नोटीस दिली जात आहे. हा कोणता न्याय आहे, असा संतप्त सवाल भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात पोलिसांवर महाविकास आघाडीचा दबाव असल्याचे दिसून येत असल्याचे मुळीक म्हणाले. तसेच या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावला नाही, तर राज्यभरात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुळीक यांनी यावेळी सरकारला दिला आहे.