Pooja Chavan Suicide Case : पुण्यातील भाजपच्या नगरसेवकावर पूजाचा मोबाईल आणि लॅपटॉप चोरल्याचा आरोप; घोगरे म्हणाले – ‘अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – परळीच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता असून, पुण्यातील भाजपच्या नगरसेवकावर पूजाचा मोबाईल अन लॅपटॉप चोरल्याचा आरोप झाला आहे. त्यावर घोगरे यांनी प्रतिक्रिया दिली असून, आपण अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पण भाजपने यात शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेत राजकारणात खळबळ उडवून दिली. तर पूजाच्या आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. त्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

पूजा चव्हाण हिचे काही फोटो व अडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. पूजा हिचा मोबाईल, लॅपटॉप गायब झाला आहे. तो कुठे याचा शोध लागलेला नाही. तर दुसरीकडे पूजा हिचे फोटो आणि क्लिप व्हायरल होत आहेत.

परळीच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख संगीता चव्हाण यांनी उडी घेत मोबाईल व लॅपटॉप पुण्यातील भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी चोरला असून, ते माध्यमांना फोटो पुरवत असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे नवा वाद पेटला आहे. याबाबत घोगरे यांना विचारले असता त्यांनी माझ्याकडे लॅपटॉप असण्याचा प्रश्नच नाही. त्यादिवशी मी माणुसकीच्या दृष्टीने मदत केली. तो गुन्हा आहे का. मी आता अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हंटले आहे.