चित्रा वाघ यांची वनमंत्री राठोडांवर सडकून टीका, म्हणाल्या – ‘आपण काहीही करायच अन् समाजाला वेठीस धरायचं हे चालणार नाही’

पोलीसनामा ऑनलाईन : सध्या बलात्काऱ्यांना पाठिशी घालणाऱ्या लोकांची तू पाठिशी घालणार का मी पाठिशी घालू अशी चढाओढ सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला हे सर्व शोभणारे नाही. परंतु आता या लोकांनी नुसत्या घोषणा बाजूला ठेवून वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मुसक्या आवळायला हव्यात. राठोडांनी समाजाला वेठीस धरल आहे. बंजारा समाजाबद्दल आम्हाला आदर आहे. आपण काहीही करायच आणि समाजाला वेठीस धरायचं हे चालू देणार नाही. आरोपीला कोणतीही जात, धर्म नसतो, असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर सडकून टीका केली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी (दि. 23) पहिल्यांदाच सर्वासमोर येऊन या प्रकरणी स्पष्टीकरण दिले. पोहरादेवी गडावर जाऊन राठोड यांनी संत सेवालाल महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी राठोड समर्थकांनी पोहरादेवी गडावर गर्दी करत शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी या प्रकरणाचा माझा काहीही संबंध नाही. माझी, कुटुंबाची अन् समाजाची बदनामी करू नका. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तपासाचे आदेश दिलेत. या चौकशीत सगळ्या गोष्टी समोर येतील, असे म्हटले होते, त्यावर चित्रा वाघ यांनी राठोड यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

सध्या समाजाला वेठीस धरण्याच्या ट्रेंड आता राजकारणात सुरू झाला आहे. कितीही लोक आली जोरात नारे दिले म्हणून तुम्ही खरे आहात असे होत नाही. बंजारा समाज धाडसी आहे. आम्हाला आदर आहे. परंतु तो आदर संजय राठोडांसाठी नाही. जे अनुत्तरीत प्रश्न आहेत त्याची उत्तर त्यांना द्यावीच लागतील. महिलांचा विषय हा राजकारणाचा विषय नाही, असेही वाघ म्हणाल्या. सर्वांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला. परंतु त्यांच्याच पक्षाच्या नेता आपल वाईट कृत्य समाजाच्या मागे घालून झाकण्याचा प्रयत्न करत आहे. याबद्दल गर्दी जमवून अस कोण करु शकत याची माहिती मुख्यमंत्र्यानी घेतली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.