Pooja Chavan Suicide Case : प्रकरणाला नवीन वळण, पूजाचे वडिल लहू चव्हाणांची पोलिस ठाण्यात धाव

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – परळी वैजनाथ येथील पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. विरोधकांचा वाढता दबाव यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संजय राठोड यांचा राजीनामा घेतला. यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले. पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पुजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट केला.

पूजा चव्हाण आत्महत्येनंतर रविवारी पूजाचे आई-वडील आणि बहिण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांनी संशयावरून संजय राठोड यांचा बळी देऊ नका असे म्हटले होते. यांवरुन पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी दुसऱ्या दिवशी पूजाच्या कुटुंबावर धक्कादायक आरोप केले. पूजाच्या आई वडिलांनी संजय राठोड यांच्याकडून पाच कोटी रुपये घेतल्याचा दावा त्यांनी केला. आता या प्रकरणी पूजा चव्हाण हिचे वडील लहू चव्हाण यांनी परळी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी परळी पोलीस ठाण्यात शांताबाई राठोड यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. शांताबाई राठोड आमची नातेवाईक नाहीत. तरीही नातेवाईक असल्याचे सांगून आमची बदनामी करत आहे. शांताबाई राठोड यांनी आमच्या कुटुंबीयांवर केलेले आरोप निराधार असून आमची बदनामी करणारे आहेत. त्यामुळे शांताबाई राठोड विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा व आमची बदनामी थांबवावी असे अर्जात नमूद केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण लागलं आहे.

पोस्टमोर्टम रिपोर्ट मधून मृत्यूचे कारण समोर
पूजा चव्हाणच्या पोस्टमोर्टमच्या आहवालात तिच्या मणक्याला आणि डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळेच मृत्यू झाल्याचे कारण समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर मात्र पोलिसांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच याविषयीची माहिती दिली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.