Pooja Chavan Suicide Case : पूजा चव्हाणच्या भावासोबत राहत असणारा अरुण राठोड कुटुंबियांसह झाला ‘गायब’

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – परळी येथील 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. या प्रकरणात एका मंत्र्याचे नाव समोर आल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पूजा चव्हाणच्या भावासोबत राहत असणारा अरुण राठोड हा आपल्या कुटुंबीयांसोबत गायब झाल्याचे समोर आले आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयित मंत्री आणि अरुण राठोड यांच्यात झालेल्या संवादाचे ऑडिओ क्लिप व्हायरल झाले आहेत. या ऑडिओ क्लिपमधील संवादाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये ज्या अरुण राठोडचा आवाज आहे तो अरुण राठोड हा पूजा चव्हाण हिच्या भावासोबत एकाच घरात राहत होता. मात्र, घटना घडल्यानंतर अरुण राठोड हा त्याच्या कुटुंबियांसह गायब झाल्याचे वृत्त एका वृत्तवाहीनीने दिले आहे.

ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर अरुण राठोड हा आपल्या कुटुंबासोबत गायब झाला आहे. अरुण राठोड हा या प्रकरणातील महत्त्वाचा धागा असल्याने त्यांच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या जीविताला धोका असल्याचे अरुण राठोड याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

पूजा चव्हाण प्रकरणाचा घटनाक्रम

– 7 फेब्रुवारी (रविवार) – पूजा चव्हाण नावाच्या टिकटॉक स्टारने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले. तिने वानवडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीच्या इमारतीच्या बाल्कनीतून उडी मारुन आत्महत्या केली. यानंतर काही दिवस हे प्रकरण शांत होते.

– 12 फेब्रुवारी (शुक्रवार) – वानवडी पोलिसांना पूजा चव्हाण मृत्यूशी संबंधीत काही ऑडिओ क्लिप मिळाल्या. यामध्ये दोन पुरुषांचा आवाज होता. यावरुन, पूजा आत्महत्या करणार असल्याची माहिती अगोदर काही लोकांना होती. यानंतर या ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागलं.

– या प्रकरणात आघाडी सरकारमधील एका नेत्याचा हात असल्याचा दावा सोशल मीडियात करण्यात आला.

– विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

– भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करुन कारवाईची मागणी केली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले. यानंतर हे प्रकरण वाढत गेले. प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा उचलून धरला.

13 फेब्रुवारी (शनिवार) – महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच पुणे पोलिसांना देखील नोटीस पाठवली.

– या प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, 13 फेब्रुवारी रोजी त्यांनी मौन सोडलं आणि चौकशीचं आश्वासन दिलं.

– पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडल्याचा दावा तिच्यासोबत असणाऱ्या दोन मित्रांनी केला.

– पूजाची लहान बहिण दिया चव्हाण हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहीत म्हटले, माझी बहिण वाघिण होती, ती असं करु शकत नाही. जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल तर त्यात नक्कीच मोठं कारण असेल.