Pooja Chavan Suicide Case : संजय राठोड नेमकं काय करण्याच्या तयारीत ? ‘त्या’ मेसेजमुळं चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळं अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड गेल्या 2 आठवड्यांपासून बेपत्ता आहेत. कुणालाही याची माहिती नाही की, ते नेमके कुठे आहेत. परंतु आता लवकरच ते सर्वांसमोर येण्याची शक्यता आहे.

शिवसेना नेते संजय राठोड बेपत्ता झाल्यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं. राठोड निर्दोष असतील तर समोर का येत नाहीत असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी नोंदवलेल्या जबाबात राठोड यांच्या नावाचा उल्लेख नाही. पूजाच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यू बद्दल कोणतीही शंका उपस्थित केली नाही. मात्र तरीही राठोड बेपत्ता असल्यानं उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

उद्या पोहरा देवीच्या दर्शनासाठी संजय राठोड यांच्या येण्याची दाट शक्यता आहे. राठोड समर्थकांनी तशी तयारीही सुरू केली आहे. पोहरा देवीला उद्या शक्ती प्रदर्शन करण्याचा राठोड यांच्या समर्थकांचा मानस आहे.

व्हॉट्सॲपसह इतर सोशल मीडियावर राठोड समर्थकांकडून उद्या सकाळी 11 वाजता पोहरादेवीत एकत्र जमण्याचं आवाहन केलं जाताना दिसत आहे. सोशलवर याबद्दलचे अनेक मेसेज व्हायरल होताना दिसत आहेत.

इतकंच नाही तर बंजारा समाजाच्या अनेक ग्रुप्सवर, राठोड यांना पाठींबा देणं गरजेचं आहे. अन्यथा समाजाचं नुकसान होईल अशा आशयाचे मेसेज व्हायरल करण्यात आले आहेत. मेसेजमधून असं आवाहन केलं जात आहे की, राठोड यांना पाठींबा देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित रहा.

एका व्यक्तीनं किमान 10 जणांना सोबत घेऊन राठोड यांच्या स्वागताला उपस्थित रहावं असा उल्लेख या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळं राठोड उद्या पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच गर्दी टाळण्याचं आवाहन दिलं आहे. तसं न झाल्यास त्यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. परंतु त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते मात्र शक्तीप्रदर्नाच्या तयारीत दिसत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार यांच्यासह शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी त्यांचे पुढील काही दिवसातील दौरे रद्द केले असताना, राठोड समर्थक मात्र स्वगताची तयारी करत असल्याचं चित्र आहे.