Pooja Chavan Suicide Case : संजय राठोड ‘या’ व्यक्तींच्या संपर्कात ? कार्यालयातील प्रशासकीय सुरळीत सुरु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरुण राठोड हे नाव प्रखरतेने समोर येत आहे. पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्यानंतर काही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. यामध्ये शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचे पूजा चव्हाण हिच्या सोबत असलेल्या कथित प्रेमसंबंधावरून पूजाने आत्महत्या केल्याचा आरोप विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून केला जात आहे. भाजपने ऑडिओ क्लिप देऊन यामधील आवाजाचा तपास करण्याची मागणी केली होती. आता या ऑडिओ क्लिपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरु करण्यात आला आहे.

पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्यानंतर काही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संजय राठोड यांचे नाव समोर आले. संजय राठोड हे पूजासोबत बोलत असतानाचे 10-12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने हे प्रकरण चांगलेच तापू लागले. राज्यातील विरोधी पक्षाने संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव टाकला जात आहे. यामुळे संजय राठोड यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे.

संजय राठोड नॉट रिचेबल, मात्र कामकाज सुरळीत

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर संजय राठोड गायब झाले आहेत. त्यांचा फोनही लागत नाही. मुंबई आणि यवतमाळ येथील त्यांच्या निवासस्थानी देखील ते नाहीत. त्यामुळे संजय राठोड हे नेमके आहेत तरी कुठे, असा सवाल उपस्थित केला जाता आहे. याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून संजय राठोड नॉट रिचेबल आहेत. परंतु आज मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयातील प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरु आहे. त्यामुळे संजय राठोड हे कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असावेत अशी शंका उपस्थित केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला राठोड याची गैरहजेरी

पूजा चव्हाण या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर शिवसेनेने सावध भूमिका घेतली आहे. दरम्यान या प्रकरणात राठोड यांचे नाव आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीमध्ये संजय राठोड गैरजहर होते. आज कॅबिनेट मंत्र्यांची बैठक होणार असून या बैठकीला संजय राठोड उपस्थित राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय राठोड प्रसारमाध्यमांसमोर येणार

या प्रकरणानंतर संजय राठोड कुठे आहेत हे समजू शकले नाहीत. मात्र, येत्या गुरुवारी (दि.18) ते प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार असल्याची माहिती समोर येत आहे. वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी या गावात बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. गुरुवारी या मंदिरात येऊनच धर्मगुरुंच्या साक्षीने संजय राठोड आपली बाजू मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

बीड जिल्ह्यातील परळी या गावची असलेली पूजा चव्हाण काही दिवसांपूर्वी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. भाऊ आणि मित्रासोबत ती वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत रहात होती. सोमवारी (दि.8) तिनं इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याचे आरोप झाले. परंतु पूजानं मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.