Pooja Chavan Suicide Case : आंदोलन करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचं उल्लंघन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांमध्ये राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सभा, आंदोलन आणि बाहेर गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आज पुणे मध्ये पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोडवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी भाजप युवा मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्या नेतृत्वाखाली वानवडी पोलिस स्टेशन बाहेर आंदोलन करण्यात आले आहे.या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी मास्क घातले नव्हते तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे पालनसुद्धा केले नव्हते. यामुळे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाचे एक प्रकारे उल्लंघन केले आहे.

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येला १८ दिवस पूर्ण झाले आहेत. या प्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात अजुनही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तो गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. या दरम्यान आज भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी घटनास्थळाची पहाणी केली आहे. यानंतर त्यांनी वानवडी पोलिस स्टेशन आणि पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन संजय राठोड यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. मात्र या बाबतीत पोलिस आयुक्तांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने चित्रा वाघ यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यानंतर काही वेळाने भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वानवडी पोलिस स्टेशन बाहेर संजय राठोडवर कारवाई झाली पाहिजे ही मागणी करत आंदोलन केले. तसेच त्यांनी या आंदोलनादरम्यान त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली.

यावेळी राघवेंद्र मानकर म्हणाले की, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जोपर्यंत कारवाई होत नाही. तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा राघवेंद्र मानकर यांच्याकडून देण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग बघता सभा किंवा आंदोलन करू नये असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. तसेच मानकर पुढे म्हणाले, आम्ही नियमांचे उल्लंघन केले असेल तर आम्हाला चालेल, पण आम्हाला काही करून त्या युवतीला न्याय द्यायचा आहे अशी भूमिका त्यांच्याकडून घेण्यात आली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजप युवा मोर्चाकडून तक्रार अर्ज
भाजप युवा मोर्चाचे पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट यांनी वानवडी पोलीस स्टेशनचे एस. साळगावकर यांच्याकडे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोडवर गुन्हा दाखल करण्यात यावा असा तक्रार अर्ज दिला आहे.