Pooja Chavan Suicide Case : पूजासोबतचे फोटो अन् अरुण राठोड कोण ? मंत्री संजय राठोडांनी स्पष्ट शब्दात सांगितलं…

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. पूजा चव्हाण हिनं मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून आत्महत्याचा आरोप भाजप करत आहे. इतकंच नाही तर भाजप शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेत हल्ला चढवत आहे. अशात आता संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

‘माझं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरूय’
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राठोड म्हणाले, पूजा चव्हाण हिच्या मृत्यूबद्दल दु:ख आहे. परंतु माझा या घटनेशी काहीही संबंध नाही. मी मागासवर्गीय कुटुंबातून पुढं येऊन बंजारा, ओबीसी समाजाचं नेतृत्व करतो, माझं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

‘भेटीवेळी अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत फोटो काढत असतात…’
यावेळी पत्रकारांनी राठोड यांच्या पूजा सोबत व्हायरल होणाऱ्या फोटोंबद्दल विचारणा केली. याला उत्तर देताना ते म्हणाले, मी समाजाचं नेतृत्व करतो. लोकांमध्ये असतो. सर्वांना सोबत घेऊन मी काम करतो. भेटीवेळी अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत फोटो काढत असतात. त्यामुळं हे फोटो व्हायरल होत असतील.

‘हात जोडून विनंती करतो माझी बदनामी करू नका’
पुढं बोलताना राठोड म्हणाले, अरुण राठोड कोण आहे याची मला माहिती नाही. मी या प्रकरणावर जास्त काही बोलणार नाही. पोलीस चौकशीतून सत्य समोर येईल, परंतु हात जोडून विनंती करतो माझी बदनामी करू नका.

अरुण आणि कथित मंत्र्याच्या ऑडिओ क्लीप व्हायरल…
पूजा चव्हाण प्रकरणी अरुण राठोडचं नाव प्रखरतेनं समोर येताना दिसलं. अरुण आणि कथित मंत्र्याच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसल्या. हे संजय राठोड यांच्याशी संबंधित आहे असं भाजपचं म्हणणं होतं. ऑडिओ क्लीपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरू आहे. परंतु तो आवाज अरुणचा नाही असा दावा गावकरी आणि अरुणच्या आईनं केला होता.

कोण आहे अरुण राठोड
अरुण सुभाष राठोड हा वनविभागात नोकरीला आहे. तो बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे कुटुंबासह राहत होता. काही दिवसांपूर्वीच अरुण पूजा सोबत पुण्यात रहायला गेला होता. ऑडिओ क्लीपमध्ये अरुण राठोड याला कथित मंत्र्यानं सूचना दिल्या होत्या. परंतु हा आवाज अरुण राठोड यांचा होता का याबाबत पुष्टी नाही. पोलिसांनी या प्रकरणी अरुणची चौकशी सुरू केली आहे. ज्यावेळी पूजानं आत्महत्या केली तेव्हा अरुण राठोड तिथच उपस्थित होता. आम्हाला फक्त आवाज ऐकायला आला असं त्यानं पोलिसांना सांगितलं.