पूजा चव्हाणच्या भाऊजींचा दावा, म्हणाले- ‘तिच्या आत्महत्येला मंत्री संजय राठोड जबाबदार आहेत यात तथ्य वाटत नाही’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाणच्या बहिणीचे पती म्हणजेच तिचे भाऊजी शरद राठोड यांनी पूजा चव्हाणच्या आत्महत्येवर भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. पूजाच्या आत्महत्येला वनमंत्री संजय राठोड जबाबदार आहेत यात आम्हाला काही तथ्य वाटत नाही असं ते म्हणाले आहेत. समाजाकडून आमच्यावर कोणताही दबाव नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं. एका वृत्तावाहिनी सोबत ते बोलत होते.

‘संजय राठोड यांचा हात असल्याच्या वृत्तात तथ्य नाही’
शरद राठोड म्हणाले, जर असं काही असतं तर तिनं आईला, बहिणीला किंवा मला कोणालातरी काहीतरी सांगितलं असतं. किंवा मोबाईलवर काही पाठवलं असतं. परंतु तिनं असं कधी काही सांगितलंच नाही. फोनवर बोलताना ती सगळं ठिक आहे असंच सांगायची. ती मनात काही ठेवत नव्हती. सोशल मीडियावर जे काही सुरू आहे त्यावर काही बोलायचं नाही. सविस्तर चौकशीत खरं काय ते समोर येईल असंही ते म्हणाले.

‘आई-बापाला ती मुलासारखीच होती’
पुढं बोलताना शरद राठोड म्हणाले, पूजा पुण्याला शिकायला गेली होती. आई-बापाला ती मुलासारखीच होती. सगळं घर तिच्यावर होतं. रविवारी रात्री 3 वाजता पत्नीला फोन आला की, पूजा पडली. तिचे आईवडिल रात्रीच निघाले. आम्ही अंबाजोगाईमधून सकाळी निघालो. ससून हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथं दोन मुलं सोबत होती. पूजा पार्थिव घेऊन बीडला परतलो.

‘या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव आल्याचं सोशल मीडियावरून समजलं’
शरद राठोड यांनी असंही सांगितलं की, पूजाच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव आल्याचं सोशल मीडियावरून आम्हाला समजलं. आम्ही दुखात आहोत, तणावात आहोत. ती वाईट वागणार नाही असा विश्वास आहे. तिची बदनामी सुरू आहे. जर काही असतंच तर तिनं आम्हाला सांगितलं असतं. सुसाईड नोटही सापडली नाही. ती वाघीण होती. आईवडिलांचा आधार होती.

बीड जिल्ह्यातील परळी येथे राहणाऱ्या पूजा चव्हाण नावाच्या एका तरुणीनं पुण्यातील वानवडी येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रविवारी ही घटना घडली होती. यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लाागलं आहे. ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यामुळंच तरुणीनं आत्महत्या केल्याचा आरोप भाजपनं केला आहे. यातील विविध ऑडिओ क्लीप देखील सोशलवर व्हायरल झाल्या आहेत. यानंतर आता राजकीय वर्तुळातही खळबळ उडालेली दिसत आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीतील कथित मंत्र्याचं नाव घेतलं जात होतं. परंतु भाजपच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट वनमंत्री संजय राठोड याचं नाव घेतल्यानं खळबळ उडाली आहे. पूजा सोशल मीडियावर खूप फेमस होती. त्यामुळं याचे पडसाद तिथंही उमटल्याचं दिसत आहेत. सोशलवर देखील निरनिराळ्या चर्चा सुरू आहेत.