Pooja Chavan Suicide Case : पूजाची आत्महत्या ते मंत्री राठोड यांचा राजीनामा ! जाणून घ्या आतापर्यंतच्या सर्व घडामोडी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळं अडचणीत आल्यानं त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांचा राजीनामा स्विकारल्याचं समजत आहे. राजीनामा देणारे महाविकास आघाडीतील ते पहिलेच मंत्री आहेत. पूजा चव्हाण आत्मत्या प्रकरण आणि संजय राठोड यांचा संबंध काय ? आतापर्यंत या प्रकरणी काय काय घडामोडी घडल्या याबद्दल आपण माहिती घेऊयात.

7 फेब्रुवारी रोजी रात्री दीडच्या सुमारास पूजानं आत्महत्या केली
पूजा चव्हाण ही 22 वर्षीय तरुणी बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवाशी होती. पूजाला एकूण 5 बहिणी आहेत. त्यापैकी 4 जणींचं लग्न झालं आहे. पूजा मुलांप्रमाणेच डॅशिंगबाज होती. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही ती खूप फेमस होती. 1 महिन्यापूर्वी ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण आणि मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या घरात रहात होती. 7 फेब्रुवारी रोजी रात्री दीडच्या सुमारास पूजानं आत्महत्या केली.

चित्रा वाघ यांनी थेट संजय राठोड यांचं नाव घेतलं
पूजाच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर अनेक ऑडिओ क्लीप्स व्हायरल होताना दिसल्या. भाजपच्या महिला आघाडीनं असा आरोप केला की, एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून तिनं आत्महत्या केली. यानंतर हा मंत्री कोण असा सवाल केला जाऊ लागला. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याचे संकेतही दिले. परंतु चित्रा वाघ यांनी थेट संजय राठोड यांचं नाव घेतल्यानं त्यांची मोठी अडचण झाली.

देवेंद्र फडणवीसां या प्रकरणी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं
भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं. आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली. या आत्महत्येमुळं बंजारा समाजात अस्वस्थता आहे असंही त्यांनी पत्रात नमूद केलं.

अरुण राठोडचं नाव प्रखरतेनं समोर येताना दिसलं
पूजा चव्हाण प्रकरणी अरुण राठोडचं नाव प्रखरतेनं समोर येताना दिसलं. अरुण आणि कथित मंत्र्याच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसल्या. हे संजय राठोड यांच्याशी संबंधित आहे असं भाजपचं म्हणणं होतं. ऑडिओ क्लीपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरू आहे. परंतु तो आवाज अरुणचा नाही असा दावा गावकरी आणि अरुणच्या आईनं केला.

चंद्रकांत पाटील यांनी दिला इशारा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यानंतर आत्महत्या केलेल्या मुलीच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह माहिती सापडली आहे पोलिसांनी तिचा मोबाईल व लॅपटॉप जप्त केल आहे. त्यात काय आहे हे पोलिसांनी जाहीर करावं, नाहीतर 2-3 दिवसात याची माहिती समोर येईलच असा इशारा दिला.

पूजाचे वडिल लहू चव्हाण या प्रकरणी बोलताना म्हणाले…
यानंतर पूजा चव्हाण प्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. यानंतर पूजाचे कुटुंबीय पुढे आले आणि त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. पूजाचे वडिल लहू चव्हाण या प्रकरणी बोलताना म्हणाले, पूजाच्या आत्महत्यासंदर्भात ज्या ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहेत त्यातील आवाज पूजाचा नाही. पूजाच्या आत्महत्या प्रकरणी आपली कोणाविरोधातही तक्रार नाही, कुणाविषयी शंका नाही. त्यामुळं आमची आणि समाजाची बदनामी करून आम्हाला वेदना देऊ नका अशी विनंतीही त्यांनी केली. इतकंच नाही तर ज्यांचं नाव या प्रकरणात जोडलं जात आहे ते मंत्री संजय राठोड पूजाच्या वडिलांसारखे आहेत असंही त्यांनी एका वृत्तपत्रासोबत बोलताना सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पोलीस चौकशीचे आदेश दिले
यानंतर राजकीय वातावरणही तापलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य करत पोलीस चौकशीचे आदेश दिले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी दोषी असेल त्यांना सोडणार नाही, परंतु कोणावर अन्यायदेखील होणार नाही अशी सावध भूमिकाही त्यांनी घेतली.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले…
भाजपनं घेतलेली आक्रमक भूमिका यानंतरही कायम होती. या संपूर्ण प्रकरणात संजय राठोड यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. इतकंच नाही तर त्यांची हाकालपट्टी करा अशी मागणीही त्यांनी केली. यानंतर या प्रकरणी संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल. चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर राज्य सरकार त्याबाबत निर्णय घेईल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

भाजपनं सांगितलं अरुण राठोड यानंच दिली संजय राठोडांच्या नावाची कबुली
या प्रकरणात संजय राठोड यांचा सहभाग असल्याच्या आरोपावर भाजप एवढा ठाम कसा आहे याबाबत माहिती घेतली असता त्यांच्या मते या संपूर्ण प्रकरणात संजय राठोड यांचा सहभाग असल्याची कबुली खुद्द अरुण राठोड यानंच दिली आहे. इतकंच नाही तर आपण या प्रकरणात अडकू नये यासाठी त्यानंच भाजप नेत्यांना ऑडिओ क्लीप्स दिल्या असंही सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यंनी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला
एकूणच हे प्रकरण खूप गंभीर असल्याचं पाहिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यंनी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला आहे. या राजीनाम्यानतून ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीलाही इशारा दिला आहे. कारण त्यापूर्वी राष्ट्रवादीच्याही दोन मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले आहेत. मंत्र्याच्या बंगल्यात तरुणाला मारहाण आणि महिला बलात्काराचा आरोप राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर झाला आहे. त्यामुळं संजय राठोड या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हवी या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा घेऊन राष्ट्रवादीला योग्य तो संदेश दिल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू असल्याचं दिसत आहे.