मंत्री संजय राठोड आज सर्वांसमोर येणार; त्यापूर्वी व्हायरल झाले पूजासोबतचे आणखी काही फोटो

पोलिसनामा ऑनलाईन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळं अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड गेल्या 2 आठवड्यांपासून बेपत्ता आहेत. कुणालाही याची माहिती नाही की, ते नेमके कुठे आहेत. परंतु आता लवकरच ते सर्वांसमोर येण्याची शक्यता आहे. बंजारा समाजाचं पवित्र स्थान असलेल्या पोहरादेवी येथे ते दर्शनासाठी येणार आहेत. त्यानिमित्तानं या प्रकरणी झालेल्या आरोपानंतर ते प्रथमच सर्वांसमोर येणार आहेत. त्यापूर्वी आता पूजा आणि संजय राठोड यांचे काही फोटो समोर आले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

काही फोटोत पूजा चव्हाण तिचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. अनेक फोटोत राठोड आणि पूजा एकत्र पोज देताना दिसत आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असल्याचं दिसत आहेत.

दरम्यान शिवसेना नेते संजय राठोड बेपत्ता झाल्यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं. राठोड निर्दोष असतील तर समोर का येत नाहीत असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी नोंदवलेल्या जबाबात राठोड यांच्या नावाचा उल्लेख नाही. पूजाच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यू बद्दल कोणतीही शंका उपस्थित केली नाही. मात्र तरीही राठोड बेपत्ता असल्यानं उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

आज पोहरा देवीच्या दर्शनासाठी संजय राठोड यांच्या येण्याची दाट शक्यता आहे. राठोड समर्थकांनी तशी तयारीही सुरू केली आहे. पोहरा देवीला उद्या शक्ती प्रदर्शन करण्याचा राठोड यांच्या समर्थकांचा मानस आहे. आज राठोड खरंच सर्वांसमोर येणार का आणि आले तर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.