पूजा चव्हाणच्या मृत्यूचं गुढ आणखीनच झालं ‘गडद’, बँकेनं दिली नवीन माहिती

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वानवडी परिसरात राहत्या इमारतीच्या बाल्कनीतून उडी मारुन आत्महत्या केली. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राजकीय नेत्याचे नाव आल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले. या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत असून पूजाच्या मृत्यूचे गूढ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पूजाने ज्या बँकेकडून कुक्कुटपालनासाठी कर्ज घेतले होते, त्या स्टेट बँकेनं पूजाला कर्जाबाबत कोणताही त्रास दिला नसल्याचा खुलासा केला आहे.

पूजाच्या आत्महत्येन नंतर या प्रकरणात वेगवेगळी माहिती समोर आली. पूजाच्या वडिलांनी सांगितले की, बँकेचं कर्ज असल्याने पूजा तणावात होती, बँकेकडून सतत कर्जाबाबत विचारणा होत होती. त्यामुळे तिला चक्कर आली आणि खाली पडून तिचा मृत्यू झाला असावा, असा दावा पूजाचे वडिल लहू चव्हाण यांनी केला होता. मात्र, बँकेतून पूजाने घेतलेल्या कर्जाबाबत कसलाही त्रास देण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.

डिसेंबर 2018 मध्ये पूजाने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत 13 लाख 50 हजाराचे कर्ज मंजूर झाले होते. परळी येथील गांधी मार्केट मधील स्टेट बँकेने हे कर्ज दिले होते. आतापर्यंत 35 हजार 500 रुपयाप्रमाणे 12 हप्ते पूजाने भरले आहेत. या कर्जासाठी बँकेकडून कसलीही विचारणा झाली नसल्याचे बँक अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

काय म्हणाले पूजाचे वडील ?
माझ्या मुलीची बदनामी थांबवा असे आवाहन पूजाचे वडिल लहू चव्हाण यांनी केले आहे. पोल्ट्रीमध्ये झालेल्या नुकसानीमुळं पूजा काहीशी तणावता होती, असा खुलसा त्यांनी केला आहे. तसेच तिच्यावर मानसिक उपचारही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. पूजाच्या वडिलांनी मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप करण्याचे टाळलं.