Pooja Chavan suicide case: वादग्रस्त मंत्र्याची हकालपट्टी करून कारवाई करा, भाजपा महिला मोर्चाचं उद्या राज्यभरात ‘चक्का जाम आंदोलन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या राज्यात पूजा चव्हाण हे प्रकरण खूप गाजत आहे. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येमध्ये समोर आलेल्या पुराव्यानुसार एका महाविकास आघाडी मधील मंत्र्यांचा समावेश आहे. म्हणून त्या मंत्र्यावर कारवाई करून त्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यासाठी भाजपा महिला मोर्चा राज्यभरात उद्या चक्का जाम आंदोलन करणार आहे. लोकांनी या आंदोलनात मोठया संख्येने सहभागी होऊन राज्य सरकारला धडा शिकवावा असे आवाहन भाजपा महाराष्ट्र कडून करण्यात आले आहे.

पूजा चव्हाण हिने १८ दिवसांपूर्वी पुण्यातील वानवडी परिसरात आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर अनेक ऑडिओ क्लीप आणि फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते. दरम्यान भाजपकडून पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेण्यात आले. त्यामुळे हे प्रकरण अजूनच पेटलं. तसेच पुणे पोलिसांनी अजूनही संजय राठोड यांची चौकशी केली नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. भाजपच्या चित्रा वाघ यांच्याकडून काल पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या स्वरदा बापट यांनी याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल केला.

एवढंच नव्हे तर आज पुण्यातील लष्कर न्यायालयात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाईसाठी खासगी खटला दाखल केला गेला आहे. मात्र या बाबत अजूनही ठोस कारवाई झाली नसल्याने भाजपा महिला मोर्चा यांच्याकडून उद्या राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. लोकांनी या आंदोलनात मोठया संख्येने सहभागी होऊन राज्य सरकारला धडा शिकवावा असे आवाहन भाजपा महाराष्ट्रकडून करण्यात आले आहे.