Pooja Chavan Suicide Case : ‘हा सोहळा कशासाठी ? पूजाला न्याय मिळेपर्यंत लढा देत राहणार’ : नातेवाईक शांताताई राठोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. पूजा चव्हाण हिनं मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून आत्महत्याचा आरोप भाजप करत आहे. इतकंच नाही तर भाजप शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेत हल्ला चढवत आहे. अशात आता संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावर आज पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यानंतर आता पूजा चव्हाण यांच्या नातेवाईक शांताताई राठोड यांनी यावर प्रतिक्रिया देत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

शांताताई राठोड म्हणाल्या, संजय राठोड यांचा सोहळा बंजारा समाजाची दिशाभूल करणारा आहे. त्यामुळं जोपर्यंत पूजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी हा लढा देतच राहणार आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी देखील त्यांनी यावेळी बोलताना केली.

पुढं बोलताना त्यांनी सांगितलं की, पूजाला जर न्याय मिळाला नाही, तर मंत्रालायवर धडक मोर्चा काढू असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळं आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. हे प्रकरण आता आणखी पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.

काय म्हणाले होते संजय राठोड ?
संजय राठोड म्हणाले, 15 दिवस मी कुठेही गेलो नव्हतो माझ्या पत्नीला ब्ल्ड प्रेशरचा त्रास आहे. आई वडिल वृद्ध आहेत. त्यांच्या सोबत 10 दिवस होतो. या काळात मी त्यांच्या सोबत होतो. या काळात कोणतंही काम थांबलं नाही. 10 दिवस शासकीय बंगल्यावरून काम पाहिलं. अरुण राठोड कोण आहे हे मला माहिती नाही. माझ्यासोबत सर्वजण फोटो काढत असतात. परंतु एका घटनेमुळं मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

पुढं बोलताना राठोड म्हणाले, पूजा चव्हाण ही बंजारा समाजाची मुलगी होती. तिच्या मृत्यूमुळं संपूर्ण बंजारा समाजाला दु:ख झालं आहे. आम्ही सगळे चव्हाण कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत. या प्रकरणी महाराष्ट्रात खूप घाणेरडं राजकारण करण्यात आलं आहे.

मंत्री राठोड असंही म्हणाले, मी गेल्या 30 वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय आयुष्यात आहे. परंतु या प्रकरणामुळं वाटेल ते आरोप करून माझं आयुष्य उध्वस्त करण्याचा वाईट प्रकार पाहण्यास मिळाला आहे. प्रसारमाध्यमं, सोशल मीडियातून जे काही दाखवण्यात आलं होत, त्यात काहीही तथ्य नाही असा दावाही त्यांनी केला.