विक्रीकरता आणलेले दुर्मिळ प्रजातीचे खवले मांजर पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दुर्मिळ पॅगोलीन (खवले मांजर) प्रजातीचे ७० लाख रुपये किंमतीचे खवले मांजर विक्रीसाठी घेऊन आलेल्या तीन जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पॅगोलिन मांजर जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास कात्रज भागातील कात्रज जंक्शन भागात करण्यात आली.

योगेश शिवाजी बोंडेकर (वय-२४ रा. वेल्हे), विठ्ठल अंकुश ढगारे (वय-२६ रा. बहिरवाडी, ता. पुरंदर), अरुण सुरेश कुसाळकर (वय-२५ रा. दत्तनगर, चिंचवड, मुळ रा. चक्करबळ्ली, जि. धुळे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचे दोन साथिदार संधीचा फायदा घेऊन फररा झाले.

दुर्मिळ होत असलेले खवल्या जातीच्या मांजराची विक्री करण्यासाठी कात्रज जंक्शन येथे चार ते पाच जण पांढऱ्या रंगाच्या अॅसेंट कारमधून येणार असल्याची माहिती तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी व पोलीस शिपाई महेश मंडलिक यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वन्यजिव अधिकाऱ्यांसह कात्रज जंक्शन येथे सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या कारची झडती घेतली असता कारच्या डिक्कीमध्ये एका पोत्यामध्ये खवल्या जातीचे मांजर आढळून आले. हे दुर्मिळ जातीचे मांजर असल्याची खात्री वन्य अधिकारी सखराम बुचडे व वनरक्षक स्वाती खेडकर यांनी दिली. या मांजराची लांबी १२८ सेंमी असून वजन ९ किलो २०० ग्रॅम आहे. याची बाजारपेठेत ७० लाख रुपये किंमत आहे.

पोलिसांनी कार आणि खवले मांजर जप्त करुन तीन जणांना अटक केली आहे. खवले मांजर संरक्षण व उपचारासाठी राजीव गांधी प्राणीसंग्राहलय व वन्यजिव संशोधन केंद्र अनाथालय पुणे येथे जमा करण्यात आले आहे. या मांजरावर उपचार करुन पुन्हा जंगलात सोडण्यात येणार आहे.

ही कारवाई उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलीस पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णु ताम्हाणे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, सहायक पोलीस निरीक्षक सतिश उमरे, पोलीस उप निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलीस हवालदार कृष्णा बढे, सर्फराज देशमुख, अभिजीत रत्नपारखी, महेश मंडलिक, राहुल तांबे, बाळासाहेब नागराळे यांच्या पथकाने केली.