रस्त्याचे काम पूर्ण व्हायच्या आधीच फुटपाथची दुरवस्था : वाघोलीतील परस्थिती

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन टीम – वाघोली ता. हवेली येथील वाघेश्वर मंदिर ते श्रेयस गार्डन दरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे, सुशोभिकरणाचे व फुटपाथ चे काम सुमारे अकरा कोटी रुपये खर्च करून पीएमआरडीएच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे,या तीन वर्षात अनेकदा काम पुर्ण होणाबाबत अंतिम तारिख देण्यात आली परंतु आज अखेर पर्यत हे काम पुर्ण झालेले नाही. हे काम अजूनही बरेच ठिकाणी अपूर्ण अवस्थेत आहे. जे काही काम झाले आहे त्या कामाच्या फुटपाथची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे.

अनेक ठिकाणी फुटपाथवर बसवण्यात आलेले गट्टू निघून गेले आहेत ,रस्ताच्या कडेला गटार लाइनवर बसवलेल्या चेबंरची देखील काही ठिकाणी दुरावस्था झाली असून रस्ताच्या मधोमध बसवलेल्या दुभाजकाच्या जागी काही ठिकाणी विटाचे बांधकाम करण्यात आले त्यांची देखील दुरावस्था झाली आहे.त्यामुळे एकूणच काय तर या रस्त्याचे काम पूर्ण होण्याच्या आधीच झालेल्या कामाची दुरावस्था होण्यास सुरुवात झाली आहे.

हे काम सुरू झाल्यापासूनच या कामाच्या गुणवत्तेबाबत वेळोवेळी तक्रारीदेखील करण्यात आल्या या संबंधीच्या बातम्या देखील प्रकाशित करण्यात आल्या परंतु संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी कामाच्या गुणवत्तेकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत .अधिकारी आणि ठेकेदाराच्या हलगर्जी पणामुळे या रस्त्याच्या फुटपाथची दयनीय अवस्था झाल्याचे बोलले जात आहे. एकूणच काय तर संबंधित अधिकारी संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा आरोप वाघोलीतील सुज्ञ नागरिक करत आहेत.