पॉर्न पाहणाऱ्यांनो सावधान…! तुम्हालाही येऊ शकतो खंडणीसाठी इमेल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मोबाईल, संगणकावर अश्लील चित्रफिती पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारने पॉर्न बॅन केले असले तरी अजूनही कित्येक जण पॉर्न बघत असल्याचे कळत आहे. पण हे सगळं तुम्ही जेव्हा पाहत असतात तेव्हा कुणीतरी तुमच्यावर लक्ष ठेवून असतं याच्याविषयी पुरावे उघड करून समाजात नाचक्की करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसांत सुरू झाले आहेत. मुंबईतल्या अनेकांना या फसव्या ईमेलने लक्ष्य केले आहे. सायबरतज्ज्ञ या प्रकाराचा उल्लेख ‘सेक्स्टॉर्शन’ असा करतात.
‘मोबाइलवर, कॉम्प्युटरवर पोर्न (अश्लील चित्रपट, चित्रफिती) पाहतानाचे पुरावे आमच्याकडे आहेत. तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्डही आमच्याकडे आहे. त्याआधारे ईमेलद्वारे, समाजमाध्यमांवरून हे ‘पुरावे’ व्हायरल करू. बदनामी होऊ नये म्हणून बीटकॉइनद्वारे नमूद रक्कम ताबडतोब पोहोचती करा,’ अशी धमकी देणाऱ्या ईमेलचा पाऊस गेल्या दोन महिन्यांत मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पडला. हे ईमेल आजही अनेकांना येत आहेत.
सायबरतज्ज्ञ रितेश भाटिया, सायबर महाराष्ट्र विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार फसवणुकीसाठी ऑनलाइन भामटय़ांनी शोधलेला हा नवा मार्ग आहे. डेबिट-क्रेडिट कार्डचे तपशील मिळवून फसवणुकीसाठी भामटे जसे हाती असलेल्या तपशिलांवरून (डाटा) हजारोंना दूरध्वनी करतात. त्यातून एखाद-दुसरी व्यक्ती लक्ष्य होते. हे ईमेलही याच उद्देशाने केले जात आहेत. फरक इतकाच की ईमेलद्वारे भीती दाखवून स्वत:हून आपल्या खात्यावर पैसे देण्यासाठी दबाव निर्माण केला जात आहे.
ईमेल आलेल्या काही व्यक्तींकडून माहिती घेतली असता त्यात पासवर्डचा उल्लेख नव्हता. काही दिवस दुर्लक्ष केल्यावर खंडणीसाठी दुसरा ईमेल आलेला नाही. म्हणजे पाठपुरावा किंवा पुराव्यादाखल एखादे छायाचित्र किंवा चित्रण पाठवण्यात आलेले नाही. त्यावरून हे ईमेल फसवे, भीती घालून पैसे उकळण्यासाठी लावलेला सापळा असल्याचे सायबर पोलीस सांगतात.
शहरातल्या दोन तरुणींसह पाच व्यक्तींनी सायबर पोलिसांना ईमेल, खंडणीच्या मागणीबाबत माहिती दिली. बदनामी होईल या भीतिपोटी तक्रार देण्यास मात्र या व्यक्ती पुढे आल्या नाहीत, असे सांगण्यात आले.
भाटिया यांच्या माहितीनुसार गेल्या दोन महिन्यांत हे ईमेल असंख्य व्यक्तींना आले. त्यापैकी काहींनी घाबरून अवैध असलेल्या आभासी चलनाद्वारे खंडणीची रक्कम भामटय़ांकडे पोहोचतीही केली. काहींनी या ईमेलला तुम्हाला जे करायचे ते करा, असे प्रत्युत्तर धाडले. काहींनी दुर्लक्ष केले.

ईमेल फसवे असले तरी सेक्स्टॉर्शन अन्य मार्गानेही केले जाते. उदाहरणार्थ, जोडीदाराची चोरून काढलेली नग्न छायाचित्रे, प्रणयाचे चित्रण व्हायरल करू या धमकीवर पैशांसह शरीरसुखाच्या मागणीचे प्रकार वाढले आहेत.