मोबाईल प्रमाणे आता सेट टॉप बॉक्सची पोर्टेबिलिटी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जितके चॅनल तितकेच पैसे असा ग्राहक हिताचा निर्णय टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय)  ने घेतल्यानंतर ही नवी व्यवस्था लागू होण्यास ४ दिवस उरले आहेत. येत्या १ फेब्रुवारीपासून नव्या योजनेची आमलबजावणी होणार आहे. त्यातच आता ट्राय एक नवा नियम आमलात आणण्याची शक्यता आहे. एखाद्या मोबाईल कंपनीची सेवा आवडली नसल्यास ज्याप्रमाणे मोबाईल पोर्टेबिलिटीची सोय आहे त्याप्रमाणे आता केबल ऑपरेटर आणि डीटीएच कंपन्यांच्या सेट-टॉप बॉक्सचे कार्डही बदलता येणार आहे. यामुळे जे ग्राहक आताच्या ऑपरेटर कंपनीला कंटाळले आहेत त्यांना दिलासा मिळणार आहे.

डीटीएच कार्ड पोर्टेबिलिटी

आम्ही नवीन यंत्रणा आणण्यासाठी काम करतोय. मोबाइल सिम पोर्टेबिलिटी प्रमाणे डीटीएच कार्ड पोर्टेबिलिटीही निश्चितच होईल. सर्व डीटीएच कंपन्यांना ऑपरेट करता येईल अशा सेट-टॉप बॉक्सची निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सेट-टॉप बॉक्स खरेदी केल्यानंतर त्यात नवीन सॉफ्टवेअर डाउनलोड करता येईल. म्हणजे बाजारातून नवीन सेट-टॉप बॉक्स विकत घेतल्यास ज्या कंपनीची सेवा ग्राहकाला हवी आहे त्या कंपनीचे सॉफ्टवेर त्या सेट-टॉप बॉक्समध्ये डाउनलोड करता येईल. यामुळे ग्राहकाला एकदाच सेट-टॉप बॉक्स विकत घ्यावा लागेल, असं शर्मा म्हणाले.

डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्या आणि केबल ऑपरेटर्सनी ट्रायच्या या निर्णयाला विरोध केला आहे. यामुळे ट्रायला नवीन प्रणाली लागू करण्यात अडचणी येत आहेत. प्रत्येक डीटीएच कंपनीचे सेट-टॉप बॉक्स वेगवेगळे आहेत. यामुळे सेट-टॉप बॉक्सशी छेडछाड झाल्यास कंपन्यांची माहिती चोरी होऊ शकते, असा युक्तीवाद करत डीटीएच कंपन्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. पण ट्रायने यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. देश-विदेशातील सल्लागारांसोबत ट्रायने कामही सुरू केले आहे. हे काम वेगाने सुरू आहे. पण यासाठी किमान एक वर्ष लागेल, अशी माहिती ट्रायचे प्रमुख आर. एस. शर्मा यांनी दिली.

१६ कोटी ग्राहकांना मिळणार मुक्ती !

केबल आणि डीटीएच सेवा घेणारे देशभरात जवळपास १६ कोटी ग्राहक आहेत. यातील बहुतेक सेट-टॉप बॉक्स हे कंपन्यांचे आहेत. यामुळे ग्राहकांना दुसऱ्या कंपनीची सेवा घेताना दुसरा सेट-टॉप बॉक्स घ्यावा लागतो. परिणामी खराब सेवा असूनही अनेक ग्राहक त्याच कंपनीची सेवा घेत आहेत. पण ट्रायच्या सेट-टॉप बॉक्स पोर्टेबिलिटी योजनेमुळे अशा ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.