खातेवाटपावरून कॅबिनेट मंत्री जयंत पाटील नाराज ? ‘या’ प्रतिक्रियेमुळं चर्चेला उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. मात्र सरकार स्थापन होऊन 14 दिवस झाले तरी खातेवाटप झाले नव्हते. अखेर खातेवाटपाला आज मुहूर्त लागला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटप जाहीर केले. खातेवाटपानंतर राष्ट्रवादीचे नते जयंत पाटील नाराज झाल्याचे दिसून येत आहे. इतर वेळी पत्रकारांशी सहज बोलणारे जयंत पाटील यानी नो कमेंट्स असे सांगत प्रतिक्रिया देण्यास टाळले. यावरुन वित्त आणि नियोजन खाते मिळालेले जयंत पाटील नाराज असल्याच्या नव्या चर्चेला उधाण आले आहे.

जयंत पाटील हे गृह खात्यासाठी आग्रही होते. मात्र, हे खाते शिवसेनेने स्वत:कडे ठेवले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. गृह खात्यावरून खातेवाटपला विलंब झाल्याची माहिती होती. मात्र आता हे खाते शिवसेनेने स्वत:कडे ठेवल्याने राष्ट्रवादीकडे हे खाते येणार नसल्याचे स्पष्ट झाले असल्याचे बोलले जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेलल्यानंतर तब्बल 14 दिवसांनी खातेवाटप जाहीर झाले. शपथविधीनंतर लवकरच खातेवाटप जाहीर होईल असे सांगितले होते. मात्र, महत्त्वाच्या खात्यांवरून मतभेद असल्याने ते जाहीर करण्यात येत नव्हते. तीनही पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर खातेवाटपचा निर्णय जाहीर करण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असून यामध्ये अजित पवारांसह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात येईल असे सांगितले जात आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/