71 वर्षांच्या हार्ट पेशंट राष्ट्रपतींनी समुद्रात उडी मारून बुडणार्‍या मुलींचे वाचवले प्राण

अलगर्व : वृत्तसंस्था –   पोर्तुगालचे राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सूसा यांचे त्यांच्या धाडसाबद्दल सोशल मीडियावर प्रचंड कौतूक होत आहे. 71 वर्षांंचे राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी यांनी शनिवारी अथक प्रयत्नानंतर अलगर्व समुद्र किनार्‍यावर बुडणार्‍या दोन मुलींचा जीव वाचवला. राष्ट्रपतीच्या या धाडसासाठी त्यांचे जगभरातून कौतूक होत आहे. या मुलींची बोट बुडाली होती आणि त्या जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होत्या.

यानंतर राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सूसा तात्काळ पोहत त्या मुलींजवळ गेले आणि अन्य एका व्यक्तीच्या मदतीने दोघींना वाचवले. सध्या राष्ट्रपती या समुद्र किनार्‍यावर सुटी साजरी करत आहेत, जेणेकरून पर्यटनाला पुन्हा चालना मिळावी. राष्ट्रपतींनी सांगितले की, या महिला समुद्राच्या लाटांमध्ये अडकल्या होत्या, यानंतर त्या वाहत जाऊन परिआ डो अल्वोरमध्ये पोहचल्या. यावेळी मोठ्या लाटा येत होत्या. मुलींनी मोठ्याप्रमाणात समुद्राचे पाणी प्यायले होते. या घटनेचा लोकांनी व्हिडिओ बनवला असून त्यामध्ये राष्ट्रपतींनी मुलींना कसे वाचवले ते दिसत आहे.

राष्ट्रपतींनी मुलींना समुद्रात बोट चालवताना काळजी घेण्याचा सल्ला दिला. राष्ट्रपती हार्टचे रूग्ण आहेत. त्यांनी म्हटले की, या मुलींना अजून व्यवस्थित पोहायला येत नाही. या मोठ्या लाटांमध्ये चांगले पोहायला येणार्‍याला सुद्धा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.