अटकेतील ‘कोरोना’बाधित संशयिताला दाखल करण्यासाठी रात्रभर पोलिसांनी केला ‘आटापिटा’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – एका गुन्ह्यात संशयित म्हणून अटक केलेल्याला छातीत वेदना होऊ लागल्याने त्याला पुण्यात उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला स्थानिक डॉक्टरांनी दिला. चार पोलिसांसह हा संशयित पुण्यात पोहोचला. त्यावेळी तेथील परिस्थिती पाहून सर्वजण चक्रावून गेले. त्याने उपचारासाठी नकार दिला त्यामुळे त्याला पुन्हा कोल्हापूरला आणावे लागले. सबजेलमध्ये नेण्यापूर्वी त्याची चाचणी केली, तेव्हा तो कोरोनाबाधित आढळला. लगेचच त्याला दाखल करण्यासाठी धडपड सुरु झाली. प्रत्येक ठिकाणी नाहीचेच उत्तर मिळाल्याने पोलिसही वैतागले. संपूर्ण रात्र या कोरोनाबाधित संशयिताला दाखल करण्यासाठी रात्रभर पोलिसांनी आटापिटा केला. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात पोलिसांना यश आलं. हा प्रकार सोमवारी रात्री घडला.

एका गुन्ह्यात एकाला अटक करण्यात आली होती. त्याच्या छातीत वेदना होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु पुढील उपचारासाठी त्याला पुण्याला घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार हा संशयित आणि चार पोलीस कर्मचारी रुग्णवाहिकेतून पुण्यात आले. पुण्याच्या रुग्णालयात गेल्यावर तेथील अवस्था पाहून संशयित आणि पोलिसही चक्रावून गेले. त्याने प्राथमिक वगळता पुढील उपचार घेण्यास नकार दिला. अखेर वरिष्ठांशी संपर्क साधल्यावर कोल्हापुरातून स्वतंत्र पोलिस गाडी पाठवून त्याला रात्रीत कोल्हापुरात आणण्यात आले. दरम्यानच्या काळात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची ‘सीपीआर’मध्ये रात्रीत वैद्यकीय तपासणी करून कारागृहात दाखल करायचे होते. ‘सीपीआर’मध्ये चाचणी झाली. ती पॉझिटिव्ह आली आणि त्याला दाखल करण्यासाठी पोलिसांची धडपड सुरु झाली.

सुरुवातीला त्याला सबजेलमध्ये नेले तेथेही नकार मिळाला. त्यानंतर आयटीआय येथील कैद्यांच्या अलगीकरण कक्ष, आयसोलेशन हॉस्पिटल, शिवाजी विद्यापीठाचे ‘डीओटी’ अलगीकरण केंद्र आदी ठिकाणी पोलिसांनी त्याला दाखल करण्यासाठी प्रयत्न केले परंतु. प्रत्येक ठिकाणी नकार घनटाच मिळाली. संपूर्ण रात्रभर त्याला दाखल करण्यासाठी पोलीस आटापिटा करत होते. शेवटी पोलिसांनी आपल्याच पोलिस गाडीतून त्याला टाउन हॉल बागेजवळ आणले. तेथेच पॉझिटिव्ह असलेल्या पोलिस जीपमध्येच पोलिसांनी डुलका काढला. अखेर सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी झाली त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास ‘सीपीआर’मध्ये त्याला दाखल करण्यात आले.

त्या पोलिसांची चाचणी निगेटिव्ह
संशयिताला कोल्हापुरातून पुण्याला घेऊन जाण्याची ज्या पोलीस कर्मचाऱ्यांवर होती. त्यामध्ये एक ५० वर्षीय कर्मचारी होता. ही माहिती ‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी थेट वरिष्ठांचे घर गाठले. भेट झाली नाही म्हणून घरी परतले. थोड्याच वेळात त्यांना वरिष्ठांचा दूरध्वनी आला. त्यांना माहिती दिली त्यावेळी तत्काळ वरिष्ठांनी तातडीने त्यांना कोल्हापुरात बोलविले आणि दुसरा कर्मचारी पाठविला. तर दुसरीकडे संपूर्ण रात्र बाधितांच्या संपर्कात घालवलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली होती. त्यांनीहि कोरोना चाचणी केली. सुदैवाने अहवाल निगेटिव्ह आला. परंतु, त्या पोलिसांच्या जीवाशी खेळ झाला.