नवज्योतसिंग सिद्धूवर शिस्तभंगाच्या कारवाईची शक्यता ; राहुल गांधीही सिद्धूवर नाराज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील वादाची दखल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली आहे. पंजाब काँग्रेसनेदेखील सिद्धू यांना नोटीस पाठवली होती. नवज्योतसिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यामध्ये पहिल्यापासूनच चांगले संबंध नव्हते. सिद्धू सध्या पंजाब सरकारमध्ये पर्यटनमंत्री आहेत. राहुल गांधी यांच्यासोबतच्या जवळकीमुळे त्यांना हे मंत्रीपद मिळाल आहे.

निवडणुकीच्या प्रचारात सिद्धू यांच्या पत्नी नवजात कोर यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर आरोप केले होते. त्यांनीच माझे तिकीट कापले असा आरोप त्यांनी केला होता. सिद्धूनेही कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर टीका केली होती. या टीकेने भडकलेल्या अमरिंदर सिंग यांनी सिद्धूला मुख्यमंत्रीपद हवं आहे आणि त्यासाठीच तो वाट्टेल ती टीका करत असल्याचा आरोप केला होता.

राहुल यांच्या ऑफिसकडून सिद्धूच्या वादग्रस्त वक्तव्याचं फुटेज मागविण्यात आलंय तसेच पंजाब काँग्रेसनेही अहवाल मागितला आहे. राज्यात कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा चांगलाच दबदबा आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्षाने विधानसभा निवडणूक जिंकली होती. अमरिंदर सिंग यांना नाराज करणे काँग्रेसला परवडणारे नाही. राहुल गांधींनी या वादाची गांभीर्याने दखल घेतली आहे त्यामुळे सिद्धू यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम राहण्याची शक्यता आहे.

Loading...
You might also like