उद्योग क्षेत्रातील कामगारांना वेतनवाढ मिळण्याची शक्यता; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, सरकारी कर्मचार्‍यांचा DA वाढू शकतो

नवी दिल्ली : वृत्त संस्था – उद्योग क्षेत्रातील कामगार आणि सरकारी कर्मचारी यांना लवकरच एक खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकार ( central government)कंझ्युुमर प्राइस इंडेक्स-इंडस्ट्रियल वर्कर्स (सीपीआय-आयडब्ल्यू) या निर्देशांकात सुधारणा करण्याची शक्यता आहे. यामुळे उद्योग क्षेत्रातील कामगारांना वेतनवाढ मिळू शकते. याशिवाय सरकारी कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढू शकतो.

दरम्यान, यासंदर्भात केंद्रीय कामगार सचिव अपूर्व चंद्रा यांनी म्हटले की, येत्या काही दिवसांत निर्देशांकात सुधारणा करणार आहोत. त्याचा लाभ विविध क्षेत्रांतील कामगार-कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना होईल.

याबाबत उच्चस्तरीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीपीआय-आयडब्ल्यूचे सध्याचे आधार वर्ष 2001 असून ते 2016 करण्याच्या विचारात सरकार आहे. अशाप्रकारे केंद्र सरकारने बदल केल्यास लाखो औद्योगिक कामगार, सरकारी कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना लाभ होण्याची शक्यता आहे. सीपीआय-आयडब्ल्यूच्या आधारे उद्योग जगतातील कर्मचार्‍यांचे वेतन निश्चित होते. शिवाय याच आधारावर सरकारी कर्मचार्‍यांचा महागाई भत्त आणि निवृत्ती वेतनधारकांचा महागाई दिलासा (डीआर) ठरविला जातो.

आधार वर्ष बदलल्यामुळे अलीकडच्या काळातील सीपीआय-आयडब्ल्यूमध्ये बदलत्या ग्राहक शैलीचे प्रतिबिंब दिसेल. यावर नव्या मूल्यमापनाचे आधार बदलतील. शिक्षण, आरोग्य, वाहन, मोबाइल फोन खर्च आणि शहरी घरे या बाबींना अधिक महत्त्व दिले जाईल. सुधारित निर्देशांक पुढील आठवड्यात सार्वजनिक केले जातील, असे एका अधिकार्‍याने सांगितले.