पोस्ट खाते नेमणार विमा एजंट, थेट मुलाखतीद्वारे होणार प्रतिनिधींची निवड

पंढरपूरः पोलीसनामा ऑनलाईन – टपाल जीवन विमा योजना आणि ग्रामीण टपाल जीवन योजनेअंतर्गत असलेल्या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नेमणूक थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुकांनी 6 आणि 7 जानेवारी रोजी पंढरपूर येथील मुख्य पोस्ट कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन पंढरपूर येथील डाक घर अधीक्षक एन. रमेश यांनी केले आहे.

याबाबत डाक घर अधीक्षक एन. रमेश म्हणाले की, मुलाखतीसाठी येताना इच्छुकांनी आपल्या सोबत अधीक्षक डाक घर, पंढरपूर विभाग यांच्या नावाचा लेखी अर्ज व शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म तारखेचा दाखला, फोटो व अन्य संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहावे. विमा प्रतिनिधीचे काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तीचे वय 18 ते 50 वर्षांपर्यंत असावे. संबंधित व्यक्ती दहावी पास असावी, इच्छुकास विमा विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची पूर्ण माहिती असावी. बेरोजगार तरुण, तरुणी, स्वयंरोजगार असणाऱ्या महिला, पुरुष, कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ, कर्मचारी, माजी सैनिक, निवृत्त शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य किंवा वरील पात्रता असणारे सर्व इच्छुक अर्ज करू शकतात.

निवड झालेल्या उमेदवारांना कमिशन, प्रोत्साहन भत्ता मिळणार
विमा प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरवून दिल्याप्रमाणे कमिशन, प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. तसेच त्यांना टपाल खात्यामार्फत आंतरिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशा उमेदवारांना परीक्षा फी 400 आणि परवाना फी 50 रुपये जमा करावे लागतील. निवड झालेल्या उमेदवारांना पाच हजार रुपये टपाल बचत खात्यामध्ये राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्रमध्ये भारताचे राष्ट्रपती यांचे नावे तारण म्हणून ठेवावे लागणार आहेत.