राज्यातील जिल्हानिहाय नियुक्त करण्यात आलेले पालकमंत्रिपद घटनाबाह्य, रद्द करण्याची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने राज्यातील जिल्हानिहाय नियुक्त करण्यात आलेले पालकमंत्रिपद घटनाबाह्य असून ही सर्व पदे तात्काळ रद्द करण्यात यावी. अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर यांनी अशा मागणीचे पत्र राज्यपाल कोश्यारी यांना पाठविले आहे. सध्या राज्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचं पार्श्वभूमीवरती ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना देण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरु केल्या आहेत. त्या अनुषंगाने या मागणीला विशेष महत्व प्राप्त झाल्याचं दिसून येत आहे.

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १६३ (१) मधील तरतुदीनुसार पालकमंत्री या पदाचा समावेश करण्यात आलेला नाही. म्हणून मुळात हे पदच घटनाबाह्य ठरते. मग पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीकडून बैठक कोणत्या नियमांच्या आधारे घेतात? असा सवाल देखील या पत्रात उपस्थित करण्यात आला आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेतले जाणारे निर्णय लोकाभिमुख नसतात. हे सर्व राजकीय हितसंबंध डोळ्यासमोर ठेवून एका विशिष्ट हेतूने घेतले जातात. त्याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागतो. तसेच या जबाबदारीमुळे संबंधित मंत्र्यांचे त्यांच्या मूळ खात्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सुद्धा या पत्रामध्ये म्हटलं आहे.