पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा अन् मिळवा दुप्पट फायदा ! 1 लाखांचे मिळतील 2 लाख, जाणून घ्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनेकांना गुंतवणुकीची चिंता सतावते. आपल्याजवळ असलेला पैसा नक्की कुठे गुंतवावा याचा अनेकजन विचार करतात. तसेच गुंतवणूक करताना जास्त नफा कशा पद्धतीने मिळवता येईल, याचा गुंतवणूकदार विचार करतात. जर तुम्ही पैसे दुप्पट करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र (KVP) या योजनेत गुंतवणूक करू शकता. KVP भारत सरकारची वन टाइम गुंतवणूक योजना आहे. पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूकदाराला चांगला परतावा तर मिळेलच शिवाय सरकारी गॅरंटी देखील आहे, या योजनेमध्ये व्याजदर आणि गुंतवणूक दुप्पट होण्याचा कालावधी सरकारद्वारे तिमाही आधारावर निश्चित केला जातो.

किसान विकास पत्र ही योजना खास शेतक-यासाठी बनवली आहे. या योजनेच्या मॅच्युरिटीचा कालावधी 124 महिने आहे. म्हणजेच या योजनेमध्ये ग्राहकाचे पैसे गुंतवणुकीच्या 124 महिन्यांनी म्हणजेच 10 वर्ष 4 महिन्यांनी दुप्पट होतील. यात एखादा शेतकरी कमीतकमी 1000 तर जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करू शकतात.

कोण करू शकत गुंतवणूक?
KVP मध्ये गुंतवणूकीसाठी गुंतवणूकदाराचे वय 18 वर्षे असणे गरजेचे आहे. हे एक प्रकारचे प्रमाणपत्र असते. जे तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून खरेदी करू शकता. सरकारकडून एका निश्चित स्वरूपात व्याज या योजनेअंतर्गत मिळते. तुम्ही याची खरेदी अल्पवयीन मुलासाठी देखील करू शकता. ज्याची देखरेख पालकाकडून केली जाते. KVP मध्ये 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपये पर्यंतचे सर्टिफिकेट आहेत, ज्याची खरेदी करता येणार आहे.

किती वेळेत दुप्पट होतो पैसा-
KVP मध्ये व्याजदर 6.9 टक्के निश्चित केला आहे. या दरामध्ये 124 महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होतील. जर तुम्ही एकरकमी 1 लाख भरले तर तुम्हाला मॅच्यूरिटीनंतर 2 लाख मिळतील. सदर योजना इन्कम टॅक्स कायदा 80 सी अंतर्गत येत नाही, त्यामुळे रिटर्नवर तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. या योजनेत टीडीएसची कपात होत नाही.

आणखी काय सुविधा मिळतात-
केव्हीपी एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये स्थालांतरीत करता येते. KVP एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे स्थालांतरित केले जाऊ शकते. केव्हीपीमध्ये नॉमिनेशन सुविधा देखील आहे. KVP पासबुकच्या आकारात जारी केले जाते.

काय कागदपत्रे द्यावे लागतील
KVP या योजनेत गुंतवणुकीसाठी 2 पासपोर्ट साइझ फोटो, ओळखपत्र (रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आदी.) निवास प्रमाण पक्ष (वीजबिल, टेलिफोन बिल, बँक पासबूक इ.) या कागदपत्रांची गरज लागेल. जर गुंतवणूक 50 हजारांपेक्षा जास्त असेल तर पॅन कार्ड गरजेचे आहे. यात गुंतवणुकीची मर्यादा नाही आहे पण मनी लाँड्रिंगचा धोका टाळण्यासाठी 2014 पासून 50 हजारांपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी पॅन अनिवार्य केले आहे. जर तुम्ही 10 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करत असाल तर इनकम प्रुफ देखील द्यावा लागेल, जसे की ITR, पगारपत्रक, बँक स्टेटमेंट द्यावे लागेल.