पोस्ट ऑफिस लाइफ इन्शुरन्स प्रीमियम पेमेंट : 13 लाख लोकांसाठी वाढविण्यात आली मुदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   पोस्टल लाईफ इन्शुरन्स आणि रुलर पोस्टल लाईफ इन्शुरन्स चा प्रीमियम भरण्यासाठी केंद्र सरकारने 30 जून 2020 पर्यंत मुदत वाढविली आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे विमा पॉलिसीधारकांच्या समस्या लक्षात घेता केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते. वास्तविक, या दोन्ही विमा पॉलिसीधारकांना पोस्ट ऑफिसमध्ये प्रीमियमची भरपाई करण्यास त्रास होत आहे. दरम्यान, देशभरातील पोस्ट कार्यालये आवश्यक सेवांसाठी लॉकडाउनमध्ये देखील उघडली आहेत.

नाही भरावा लागणार दंड

या दोन पॉलिसीधारकांच्या सोयी लक्षात घेता पोस्टल लाईफ इन्शुरन्स संचालनालयाने प्रीमियम जमा करण्यासाठी अंतिम तारीख वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता पॉलिसीधारक मार्च, एप्रिल, मे 2020 मध्ये जमा होणारा प्रीमियम जून 2020 पर्यंत जमा करू शकतात. यासाठी त्यांना कोणताही दंड भरावा लागणार नाही. दरम्यान, ऑनलाइन पोस्टेलच्या माध्यमातून पॉलिसीधारक घरी बसून प्रीमियम भरू शकतात.

13 लाख पॉलिसीधारकांना दिलासा :

यापूर्वी पोस्टल लाईफ इन्शुरन्स आणि रुलर पोस्टल लाईफ इन्शुरन्स प्रीमियम भरण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढविण्यात आली. सरकारच्या या निर्णयानंतर आता सुमारे 13 लाख पॉलिसीधारकांना दिलासा मिळणार आहे. यात 5.5 लाख पोस्टल लाईफ इन्शुरन्स आणि 7.5 लाख रुलर पोस्टल लाईफ इन्शुरन्स पॉलिसीधारकांचा समावेश आहे. मागील महिन्यात एकूण 45 लाख पॉलिसीधारकांनी प्रीमियम जमा केला होता, परंतु या महिन्यात केवळ 29 लाख पॉलिसीधारक प्रीमियम जमा करू शकले आहेत.