राष्ट्रवादी च्या नगरसेवकांना पोस्टाने मिळाल्या नोटिसा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिकेतील  पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्याबाबत  विचारणा करणाऱ्या नोटिसा आज  राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांना पोस्टाने मिळाल्या आहेत. त्यावर संबंधित नगरसेवक काय खुलासा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

28 डिसेंबर रोजी अहमदनगर महानगरपालिकेत झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी पक्षाचे स्थानिक आमदार संग्राम जगताप यांच्या आदेशावरून भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आदेश डावलून त्यांनी भाजपला साथ दिली होती. या प्रकाराने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच भाजप-सेनेतील तणाव आणखी वाढला आहे.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी नगर दौऱ्यात या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून त्या नगरसेवकांना खुलासा मागितला आहे व त्यांना आदेश देणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी पाठवलेल्या नोटिसा संबंधित नगरसेवकांना मिळाल्या नव्हत्या. आज पोस्टाने सदर नोटीसा पक्षाच्या नगरसेवकांना प्राप्त झाल्या आहेत. त्यांना तातडीने लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, हे नगरसेवक काय आदेश देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.