लडाखमधील भारतीय सैन्य माघारी घेण्यास स्थगिती

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लडाखमधील गलवान खोर्‍यात भारतीय आणि चिनी जवानांदरम्यान झालेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कराने लेह व अन्य सीमावर्ती भागात हालचाली वाढवल्या आहेत. त्याचबरोबर लडाखमधून जे काही लष्करी युनिट माघारी येणार होते, त्यांना त्या ठिकाणीच थांबण्यास सांगण्यात आले आहे. लडाखच्या आसपास असलेल्या परिसरात तैनात असलेल्या लष्करी युनिट्सला लेहमध्ये कधीही पोहचण्यास सज्ज राहण्याचेही आदेश दिले गेले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या युनिट्सना कोणत्याही क्षणी लेहला जाण्याचे आदेश दिल्या जाऊ शकतात. लडाखमध्ये सीमेलगत असलेली गावे रिकामी करण्याची तयारी सुरू झाली आहे. लष्कराकडून गावकर्‍यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. देमचोक व पँगाँग परिसरातील वस्त्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. याशिवाय सीमेलगतच्या भागांमध्ये दुरध्वनी सेवा बंद केली आहे. केवळ ऑपरेशनशी निगडीत फोन सुरू असणार आहेत.

त्यावर देखील इनकमिंग कॉल्स बंद आहेत. लेह सिटी बाहेर सैन्या व्यतिरिक्त सर्व हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे. श्रीनगर-लेह महामार्ग सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, लष्कराच्या अधिकारी व जवानांच्या सुट्टया देखील रद्द करण्यात आल्या आहेत. चीनला लागून असलेल्या 3500 किलोमीटरच्या प्रत्यक्ष सीमेलगतच्या भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या तळांना सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. चीनकडून काही हालचाल दिसल्यास अ‍ॅक्शन घेण्याचेही सैन्याला आदेश देण्यात आले आहेत.